असच एके दिवशी घरातली सगळी कामं उरकून मी दाराच्या उंबरठ्यावर बसलेले. दोन्ही मुलं शिक्षणासाठी बाहेर असल्याने रिकाम्यावेळेत त्यांना मी रोज कॉल करून त्यांची चौकशी करायची पण जेवणाबद्दल विचारलं की त्यांचं मात्र उत्तर ठरलेलं,… अग आई तुझ्या हातचं जेवण जेवल्याशिवाय पोट काही भरत नाही. दिवस काढायचे म्हणून इथलं जेवतो नाहीतर तुझ्या हाताशिवाय मजा नाही. हे ऐकून मी मात्र बैचेन होयचे नेमकं असं बाहेरच जेवण माझी मुलं किती दिवस खाणार? एखाद त्यांच्या जवळ घरगुती पोळी भाजी केंद्र असतं तर बर झालं असतं.
तेवढ्यात घरा समोरच्या रस्त्यावर माझी नजर पडली UPSC/ MPSC करणारे विद्यार्थी हातात जेवणाचे डब्बे घेऊन जात होते. पटकन मनात एक विचार आला, जर यांनाच आणि यांच्यासारख्या आणखी गरजू लोकांना मी घरगुती जेवण बनवून दिले तर माझ्यासारख्या त्यांच्या आईंना तरी शांत झोप लागेल.
इथूनच माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एक मोठे पाऊल उचलले ते म्हणजे मुलांच्या आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे मी घरगुती पोळी भाजी केंद्र सुरु केले. इतर पोळी भाजी केंद्रापेक्षा ह्या अन्नपूर्ण केंद्रावर हळू हळू गर्दी वाढत गेली या मागील कारण एवढेच, हे सुरु करण्यामागे कोणत्याही प्रॉफिट चा विचार मी कधी केलाच नाही. सोडा नसलेले आणि घरी जेवतो असे जेवण अगदी मुलं मुलींना परवडतील अशा दारात मी देऊ लागले. बघता बघता आज २० हुन अधिक विद्यार्थी रोज माझ्याकडून पोट भर जेऊन जातात आणि हे पाहण्यासारखं दुसरं सुख नाही बरं का.
२०१८ ला मी या अन्नपूर्ण पोळीभाजी केंद्राची सुरुवात केली आणि आज माझ्याकडे जेऊन जाणारा प्रत्येक माणूस तोंडावर एक स्मित हास्य घेऊनच बाहेर पडतो याचा आनदं जास्त आहे. एक स्त्री म्हणून आपल्यावर पडणारी प्रत्येक कामं आपल्याला जबाबदारीनेच पार पडायची असतात आणि त्यातली महत्वाची जबाबदारी म्हणजे आपल्या हातचे जेवण जेऊन समोरचा माणूस तृप्त होयला पाहिजे.
बऱ्याच बायका आपली नोकरी, घरदार सांभाळून देखील आपल्या कुटुंबाची एक मोठी काळजी घेत असतात ती म्हणजे वेळेवर तुम्हाला मिळणार आहार. जर त्या सर्व काही सांभाळून एवढा संसाराचा गाढ अगदी सहज चालवत असतील. तर आपण हि आपल्यातल्या स्वयंपाक कलेचा उपयोग करून अजून चार लोकांना तृप्त करू शकतो हि देखील कल्पना माझ्या डोक्यात आली.
माझ्या अन्नपूर्ण मध्ये येणारा माणूस माझ्याशी एक वेगळंच नातं बांधून जातो. पर्याय नसल्याने विद्यार्थी मंडळीला बाहेरच खाणं भाग आहे तसेच कधी घरी कोण बाईमाणूस नसलं कि परुष मंडळी माझ्याकडून डब्बे घेऊन जातात. प्रत्येकामध्ये एक उत्तर मात्र साम्य असतं. ‘ती’ इथे नाही म्हणून तुमच्याकडे आज जेवलो पण त्याच ‘ती’ ची उणीव भासू नये म्हणून मी हा एक छोटासा प्रयत्न माझ्या लेकरांसाठी केला.
अन्न केवळ पोट भरत नाही, तर त्यात असलेली माया आणि प्रेम आत्मा तृप्त करतं. माझ्या मुलांनी सांगितलेल्या एका साध्या वाक्यातून जन्मलेल्या या विचाराने आज २० हून अधिक विद्यार्थ्यांना घरगुती, मायेचं आणि आरोग्यदायी अन्न मिळतं.
आजही एखादा विद्यार्थी जेवण केल्यावर समाधानाने हसतो, “आईच्या हातचं जेवण मिळाल्यासारखं वाटलं!” असं म्हणतो, तेव्हा वाटतं की या प्रवासात मिळणारं हे समाधानच माझं खरं यश आहे.
माझ्यासाठी हे व्यवसाय नाही, तर एका आईचं आपल्या लेकरांसाठीचं प्रेम आहे. कारण आई असो वा अन्नपूर्णा – ती नेहमीच आपल्या लेकरांसाठी उभी असते!