“ती”आईसारखीच, पण ‘आई’ म्हणून न ओळखली जाणारी

माय मराठी
5 Min Read

“दुनियाने मांडली एक कहाणी, जिला लेकरू नाही, ती आई नाही.
माया ओतते, प्रेम पाझरते, सावरते तरी नाव तिचं कुणी घेत नाही.
आईसारखीच जगते, पण “ती” आई म्हणून ओळखली जात नाही”.

बालपणापासून आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकत आलो आहोत. पण आपल्या बालपणापासून आत्तापर्यंत आपल्या आठवणीत रमलेली एक गोष्ट आहे, ती म्हणजे कृष्णाची. आपण यशोदा मातेला नमन करतो, जिने देवकीच्या मुलाला वाढवलं, प्रेम दिलं, माया दिली. आजही आपण म्हणतो, “जन्म दिला देवकीने अन वाढवलं यशोदानं.” पण ही झाली पौराणिक कथा. पण आताच्या काळातील “ती” यशोदा तुम्हाला माहीत आहे का? तर चला, आज जाणून घेऊया अशाच एका यशोदाची कथा.

नमस्कार, माझं नाव चित्रा ससाणे. मी विरार येथे माझ्या मिस्टरसोबत राहते. माझं बालपण मुंबईमध्ये झालं. आम्ही एकूण ३ भावंडं, त्यात मी सगळ्यात लहान मुलगी. लहानपणापासून आयुष्य एकदम सुखात गेलं. लहान होते म्हणून सगळे लाड पुरवले जायचे. लहानपणापासून बाबांकडून गोष्ट ऐकायचे की, एक दिवस एक राजकुमार येईल आणि मला त्याच्याकडून लांब घेऊन जाईल. मग मी माझं एक नवीन नंदनवन तयार करेन, जिथे मी, माझा राजकुमार आणि आमची लहान मुलं असतील. आधी ही गोष्ट ऐकल्यावर राग यायचा, रडूही यायचं की बाबांपासून लांब होणार.

पण जशी-जशी मोठी होत गेले, तसं-तसं हे स्वप्न आपलंस वाटू लागलं आणि हे स्वप्न जगायची इच्छा झाली. कॉलेजमध्ये असताना एक मुलगा आवडला. हळूहळू बोलणं सुरू झालं, मैत्री झाली आणि नकळत ही मैत्री प्रेमात बदलली. लग्नकार्य ठरवलं आणि घरच्यांशी बोललो. माझ्या घरात मी सगळ्यात लाडकी आणि मुलगाही रेल्वेमध्ये कामला, म्हणून होकार मिळाला. त्यांच्या घरीही सगळे आनंदी होते, पण सासूबाई जरा नाराज होत्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी माझं लग्न झालं. लहानपणापासून ऐकलेली गोष्ट खरी वाटू लागली. राजकुमाराशी तर लग्न झालं, पण आता आई बनायची इच्छा झाली.

लग्नाला ३ वर्षं झाली, पण बाळ होत नव्हतं. दवाखाण्यात तपासणी केली, वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, औषधं घेतली, नवस केले, पण आई होणं नशिबात नाही असंच वाटू लागलं. हळूहळू औषधं काम करू लागली आणि जी बातमी ऐकायला फक्त मी नाही, तर पूर्ण घर तळमळत होतं, ती बातमी कानावर आली. मी गरोदर झाले, पण डॉक्टरांचा सल्ला होता की, “हे बाळ तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो, तर विचार करा.” पण आई बनायचं हे स्वप्न कोण सोडू शकतं? पण आई बनायचंय, या हट्टामुळं मला माझं बाळ गमवावं लागलं. मिसकॅरेजनंतर कळालं की, मी आता पुन्हा आई बनू शकत नाही.

हे ऐकताच काळजात धस्स झालं. जणू आयुष्याचं स्वप्नच मोडून पडलं. सासरच्या लोकांना जेव्हा हे कळलं, तेव्हा त्यांचं वागणंही बदलू लागलं. पण नवऱ्यानं मात्र मला कधीच कमी समजलं नाही, त्याने मला खंबीरपणे साथ दिली. काही दिवस काहीच छान वाटत नव्हतं. लहानपणाचं स्वप्न पूर्ण होणार नाही, हे कळलं होतं. पण एक दिवस मी स्वतःलाच विचारलं—”आई होणं म्हणजे नक्की काय? केवळ जन्म देणं? की एखाद्या जीवावर माया करणं?” हळूहळू या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधू लागले.

एक दिवस नवऱ्यानं सुचवलं, “आपण दुसऱ्यांची मुलं सांभाळायचा विचार का करत नाही?” त्याचा प्रस्ताव ऐकून आधी मी गोंधळले. माझं स्वतःचं मूल नाही, मग मी दुसऱ्यांचं कसं सांभाळू? पण मग आठवलं—यशोदा मातेनेही कृष्णाला जन्म दिला नव्हता, पण त्याला प्रेम मात्र अमर्याद दिलं होतं. मी ठरवलं, “जर मला देवाने मूल दिलं नाही, तर मीच इतर मुलांची यशोदा बनेन.”

मी घरातच एक लहानसं बेबी केअर सेंटर सुरू केलं. सुरुवातीला ओळखीच्या एका महिलेनं तिचं बाळ सांभाळायला दिलं, मग दुसऱ्या महिलेनंही विश्वास ठेऊन तिचं मूल माझ्याकडे ठेवलं. हळूहळू हा आकडा वाढत गेला. सकाळी त्यांचे आई-बाबा त्यांना सोडून जायचे, आणि माझ्या घरात गोड गोंगाट सुरू व्हायचा. दिवसभर मी त्यांना खाऊ घालायचे, खेळवायचे, त्यांच्याशी गोष्टी बोलायचे. कोणी आजारी पडलं की काळजी घ्यायचे, कोणी रडू लागलं की कुशीत घ्यायचे. त्यांचे पहिले शब्द, पहिलं पाऊल, त्यांच्या खोडकर गमतीजमती पाहताना माझं हृदय आनंदाने भरून यायचं. प्रत्येक बाळ मला माझंच वाटू लागलं.

आज माझ्या घरी दहा-बारा चिमुकली असतात. माझं घर म्हणजे त्यांचं दुसरं घर झालंय. मी त्यांची पहिली गुरू आहे, पहिली हाक देणारी आहे, आणि त्यांच्या लहानग्या विश्वाचा एक अविभाज्य भाग आहे. मी त्यांच्यासाठी आहे, आणि ते माझ्यासाठी.

मला समजलंय की, आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही, तर कोणावर तरी निस्वार्थ प्रेम करणं, त्यांच्यासाठी झटणं आणि त्यांना सुरक्षित वाटेल असा आश्रय देणं असतं. देवाने मला माझं मूल दिलं नाही, पण मला असं मातृत्व दिलं आहे, जे अनेक छोट्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये उलगडतं.

जेव्हा ही चिमुकली माझ्या गळ्यात पडून “आईsss” म्हणून हाक मारतात, तेव्हा वाटतं की आईपण फक्त जन्माच्या नात्याने येत नसतं, ते मनाच्या नात्यानेही येतं. यशोदा मातेने जसं कृष्णावर अपार माया केली, तशीच माया मी या बाळांवर करते.

मी जन्मदाती नाही, पण मी यशोदा आहे! आणि माझ्यासाठी हेच मातृत्वाचं खरं समाधान आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more