“ती” च दुकानावर बसून पोट तर भरत होतं, पण स्वप्नांची भूक संपत नव्हती

माय मराठी
5 Min Read

तू कोशिश तो कर, जीत भी तुझे मिल ही जाएगी
रास्ते मुश्किल हैं मगर ये डगर भी टल जाएगी
जो रखे तू हौसला इस नन्ही सी जान में तेरे,
तू हर सपना तेरा पूरा कर जाएगी…

नमस्कार, माझं नाव प्रिया नाईक. मी सांताक्रूझ येथे माझ्या आईसोबत राहते. मी सध्या एका स्टार्टअप कंपनीमध्ये हेड ग्राफिक डिझायनरच्या पोस्टवर काम करते. लहानपणापासून बाबांची ही कविता ऐकत मोठी झाले. बाबांचं लेखक बनण्याचं स्वप्न होतं. पण मुंबईत राहून कुटुंबाला बघता बघता स्वतःचं स्वप्न जगणं फार कठीण होतं त्यांच्या साठी. पण माझ्यासाठी ते न्यायचे एक पुस्तकच होते. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्या कडे होतं आणि माझ्या प्रत्येक स्वप्नाला त्यांची साथ होती.

पण वाईट काळ हा प्रत्येकाच्या नशिबी येतोच. मी ८ वर्षांची असताना बाबा गेले. आई आणि मी खचून गेलो होतो, पण आईवर माझी जबाबदारी होती, म्हणून तिला घराच्या बाहेर पडावं लागलं. दिवसभर आई बाहेर काम करायची आणि रात्री घराचं काम. आईला एवढी धडपड करताना बघून वाईट वाटायचं. आईला मदत व्हावी म्हणून मी शेजारी एका दुकानात १३ वर्षांची असताना कामाला लागले. २००० रुपये हा माझा पगार झाला.

शाळेनंतर दुकानावर बसायचे. दुकानात काम करता करता अभ्यासही चालू होता. सोबत टिकल्याचे पाकीट बनवायचं काम पण हाती घेतलं. एका पाकिटावर ५ रुपये भेटायचे. माझा खर्च निघेल एवढी सोय केली असं वाटलं होतं. पण आपण जसे-जसे वाढतो, तसतसं आपल्या गरजाही वाढतात. शाळेनंतर अजून शिकायचं असेल, तर अजून काम करावं लागेल.

टिकल्यांची पाकीटं बनवून आणि दुकानावर बसून पोट तर भरत होतं, पण स्वप्नांची भूक संपत नव्हती. म्हणून एका मॉलमध्ये कपड्यांच्या दुकानात कामाला लागले. ग्राहकांना कपडे दाखवायचे आणि नंतर दिवसभर कपडे घडी करायचे. एक वर्ष काम केलं, पण मालकाची कटकट सहन होत नव्हती, म्हणून काम सोडलं.

बघता बघता १२वी झाली. अजून शिकायची इच्छा खूप होती, पण हातात पैसे नव्हते, म्हणून शिक्षण सोडून अजून काम करावं लागलं. एका स्टार्टअप अॅडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये हेल्पर म्हणून लागले. लोकांना मोठ्या खुर्चीत बसून काम करताना बघून विचार यायचा. माझी स्वप्नं पण मोठी होती, पण जर आता बाबा असते, तर हातात पुस्तकं असती, चहाचा कप नाही. तिथे काम करता करता त्यांच्या कामात रस येऊ लागला. काम शिकायची इच्छा झाली.

कॉम्प्युटरवर काम करणं हे खूप आकर्षित वाटत होतं. तिथे काम करणाऱ्या सर आणि मॅडमला एडिटिंग आणि ग्राफिक करताना बघत राहायचे. एक दिवस मन मोकळं करून एका दादाला विचारलं, “मला शिकवशील का? खूप छान आहे हे.” दादा गंमत समजून हसला, पण काही तरी नवीन शिकायची माझी इच्छा त्याला समजली. दादा ऑफिस ब्रेकमध्ये मला शिकवायला लागला. हळूहळू एडिटिंगमध्ये इतका रस आला की कळलंच नाही. माझं काम सगळ्यांना आवडू लागलं आणि हेल्परवरून एडिटर म्हणून माझी पदवी वाढली.

रोज सारखं किचनमध्ये न जाता, कॉम्प्युटर समोर जेव्हा बसले, तेव्हा वाटलं की माझ्या स्वप्नांना आता भरारी भेटेल आणि बाबांची कविता पण खरी वाटू लागली. मेहनत घेतली, कोणत्याही कामाला घाबरले नाही, सगळे अडथळे पार केले आणि आज मी हेड ग्राफिक डिझायनरची पदवी मिळवली. आज मला स्वतःच्या मेहनतीवर कमावण्याचा अभिमान आहे. आता आईला घराच्या खर्चाची चिंता करण्याची गरज नाही. आज मी एवढी सक्षम आहे कारण मी कोणत्याही कामाला कमी लेखलं नाही.

मी स्वतःला एक सुपर वूमन नाही समजत, कारण खरी सुपर वूमन माझी आई आहे, जिनं प्रत्येक गोष्टीत माझी साथ दिली. तिला माझ्यावर आणि माझ्या स्वप्नांवर विश्वास होता. आज मागे वळून पाहते, तेव्हा जाणवतं की जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. पण जर ठरवलं, तर प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करता येते. आज माझ्या आयुष्यातली ही कथा मी सांगतेय, कारण कुणालाही असं वाटू नये की परिस्थिती आपल्या स्वप्नांवर ताबा मिळवते. मेहनत, धैर्य आणि जिद्द असेल, तर कोणतंही स्वप्न दूर नाही. म्हणून मी नेहमी सांगते – स्वप्न पाहा, पण त्यासाठी लढायलाही शिका.

आणि म्हणूनच मी आज सांगू इच्छिते – “कधीही हार मानू नका, तुमचं स्वप्न फक्त तुमचं असू द्या आणि त्यासाठी तुम्ही कितीही संघर्ष करावा, कारण यश तोच साकारतो जो कधीही दिलगीर होत नाही.”

आणि हा माझा संदेश सर्वांना: “स्वप्न पहा, त्यासाठी लढा, आणि एक दिवस ते स्वप्न आपले होईल.”

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more