Kalyan: डोंबिवली, कल्याणमध्ये घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक.

माय मराठी
2 Min Read

Kalyan: डोंबिवली आणि कल्याण शहरातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांना डोंबिवलीतील मानपाडा आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने गुरुवारी सापळा लावून अटक केली. हे पाच बांगलादेशी नागरिक कोणत्याही कागदपत्रांशिवाय बेकायदेशीररीत्या भारतात घुसून डोंबिवली आणि कल्याण शहरात राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्याजवळील टाटा पॉवर देशमुख होम्सजवळील गांधीनगर झोपडपट्टीत चार बांगलादेशी नागरिक, तसेच कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार मानपाडा आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या विशेष पथकांनी त्यांना अटक करण्यासाठी कारवाई केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर झोपडपट्टी आणि रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी एका वेळेस कारवाई केली. या कारवाईत देशमुख होम्सजवळील गांधीनगर झोपडपट्टीतून चार बांगलादेशी आणि कल्याण रेल्वे स्थानकाजवळून एक बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली.

अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी लागणारी कागदपत्रे मागितली असता ती ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे हे पाचही नागरिक बेकायदेशीररीत्या भारतात राहत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्यावर मानपाडा आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चार महिला आणि एक पुरुष आहे. त्यांच्यावर परकीय नागरिक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात कल्याण-डोंबिवली परिसरात पोलिसांनी २५ हून अधिक घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. हे बहुतेक नागरिक चाळी आणि झोपडपट्टीत राहून मजुरी, चालक म्हणून काम करतात, तर महिला शहरातील बारमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more