Chhaava : या वादानंतर लक्ष्मण उतेकर आता राज ठाकरे यांची भेट घेणार…

माय मराठी
3 Min Read

अभिनेता विकी कौशल याचा भारदस्त अभिनयाची चुणूक दाखवत लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यातील एका दृश्यावर काहींनी आक्षेप घेतला होता. काहींनी तो दृश्य काढून टाकल्याशिवाय आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर, ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांची भेट घेणार आहेत. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखवल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar)आता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी मंत्री उदय सामंत यांनी चित्रपटातील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली.

मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली की, दिग्दर्शकांनी ‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा नृत्याचा भाग काढून टाकला आहे. नृत्यावरील वाद आता थांबला असेल अशी आशाही सामंत यांनी व्यक्त केली. “मी स्वतः चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फोन केला होता. त्यानंतर घडलेली सकारात्मक गोष्ट म्हणजे त्यांनी चित्रपटातील नृत्याचा भाग काढून टाकला आहे,” असे ते म्हणाले. ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा सामंत यांनी दिला होता. त्यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर या चित्रपटाबद्दल एक पोस्ट लिहिली होती.

‘धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनवला जात आहे ही आनंदाची बाब आहे. जगाला छत्रपतींचा इतिहास समजावून सांगण्यासाठी असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. तथापि, या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये आहेत असे अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. आमची भूमिका अशी आहे की हा चित्रपट तज्ञ आणि जाणकार लोकांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये. महाराजांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी कोणतीही गोष्ट सहन केली जाणार नाही. आमची भूमिका अशी आहे की चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी या संदर्भात त्वरित उपाययोजना कराव्यात आणि जर काही आक्षेपार्ह असेल तर ते काढून टाकावे. चित्रपट पाहिल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर, चित्रपटातील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे.

‘छावा’ चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी यापूर्वी ‘मिमी’, ‘जरा हटके जरा बच्चे’ आणि ‘लुका छुपी’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ट्रेलरमध्ये विकी कौशलचा रुद्र अवतार पाहून अंगावर काटा येतो. तीन मिनिटे आणि आठ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात रश्मिका मंदान्ना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईची भूमिका साकारत आहे. तर औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्नाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पार्श्वसंगीत, अ‍ॅक्शन सीन्स, संवाद आणि कलाकारांचा एकूण लूक खूपच शक्तिशाली असल्याची टिप्पणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more