प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात (Mahakumbh News) आज मौनी अमावस्येच्या निमित्ताने चांगलीच गर्दी उसळली आहे. मंगळवारी रात्री उशिरा येथे चेंगराचेंगरी झाली. या अपघातात सुमारे २० नागरिकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज, म्हणजेच बुधवारी, या महाउत्सवात सुमारे १० कोटी लोक शाही स्नानासाठी पोहोचण्याची शक्यता आहे. प्रयागराजमध्ये (Prayagraj) मोठ्या संख्येने भाविक जमले आहेत. बस, ट्रेन आणि विमानाने लोक महाकुंभासाठी येत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आज प्रयागराजच्या विमान तिकिटांच्या किमती १० पटीने वाढल्या आहेत.
पूर्वी प्रयागराजच्या विमान तिकिटांच्या किमती ५ हजार रुपये होत्या. पण आता येथे महाकुंभासाठी जाण्यासाठी विमान तिकिटांच्या किमती ३० ते ५० हजार रुपये आहेत. विशेष म्हणजे सध्या दिल्ली ते लंडन तिकिटाची किंमत ३० ते ३७ हजार रुपये आहे. इंडोनेशियाच्या तिकिटाची किंमत २७ हजार रुपये आहे. मलेशियाच्या विमान तिकिटांची किंमत १० ते १५ हजार रुपये आहे. म्हणजेच, प्रयागराजला जाण्यापेक्षा परदेशात प्रवास करणे स्वस्त आहे.
विमानाने प्रवास करू इच्छिणाऱ्या अनेक प्रवाशांनी प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटांच्या किमतींबद्दल डीजीसीएकडे तक्रार केली आहे. २७ जानेवारी रोजी डीजीसीएने विमान कंपन्यांना प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटांच्या किमती वाढवू नयेत असे सांगितले. सध्या देशातील विविध शहरांमधून प्रयागराजला जाण्यासाठी १३२ विमान सेवा सुरू आहेत. स्पाइसजेट फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी, बेंगळुरू, अहमदाबाद, मुंबई, जयपूर आणि हैदराबाद येथून प्रयागराजला नवीन विमान सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. यामुळे वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होईल. तिकिटांच्या किमती थोड्या कमी होतील अशी अपेक्षा आहे. महाकुंभादरम्यान भाविकांना दिलासा देण्यासाठी सरकार आणि विमान कंपन्या एकत्र काम करत आहेत. जेणेकरून प्रवास थोडा सोपा होईल.