Dombivli: ( शंकर जाधव ) एक डोंबिवलीकर जेष्ठ नागरिकाला मराठीत बोलल्यामुळे अपमानस्पद वागणूक मिळाली. एव्हढच नाही तर कुठेही तक्रार करा आमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही असा इशाराही मुंबईत झालेल्या एका प्रदर्शन कार्यक्रमात वय वर्षे ८२ असणाऱ्या डोंबिवलीकर रमेश विठ्ठल पारखे यांना देण्यात आला. यामुळे संबंधित जी.पी.ओ. पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांना पारखे यांनी लेखी तक्रार केली असून आता याविषी राज्य सरकार काय भूमिका घेते या प्रतिक्षेची पारखे वाट पाहत आहेत.
या विषयी रमेश पारखे यांनी सांगितल्याप्रमाणे पोस्ट खात्यातर्फे महापेक्स २५ हे प्रदर्शन २२ ते २५ जानेवारी रोजी असे चार दिवस मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात डोंबिवलीकर पारखे यांना काही साहित्य खरेदी करायचे होते. तेव्हा खिडकी नंबर ३२ वर असलेल्या व्यक्तीशी याविषयी मराठी भाषेत संभाषण केले असता हिंदीत बोला असे सांगण्यात आले. परंतु पारखे यांनी हिंदीत का आपणांस मराठी येत नाही का असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा हिंदीतच बोला असे सांगण्यात आले, इतकेच नाही तर माझ्याबद्दल कुठेही तक्रार करा माझे काहीही बिघडणार नाही, मी मराठी बोलणार नाही असा तोरा केला. असा ताठर वागणुकीमळे पारखे यांनी तक्रार केली असल्याचे सांगितले. आमच्या मराठी भाषेला राज्य भाषा दर्जा मिळाला असून जर अशी वागणूक दर वेळी मिळत असेल तर न्याय कोणाकडे मागायची अशी विचारणा आता पारखे करीत आहेत.