Carry On : राज्यसरकारच्या मार्फत अनेक योजना राबवण्यात येत असतात. मात्र, त्या योजना नेमक्या आहेत तरी काय याची इतंभूत माहिती मिळाल्या शिवाय आपल्याला त्याचे महत्व कळत नाही. तर अशाच प्रकारे आपल्या राज्यामध्ये सध्या “कॅरी ऑन” योजनेची चर्चा रंगलेली आहे. राज्यामधली सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून “कॅरी ऑन” योजना लागू करण्या संदर्भात “उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील” यांनी विद्यापीठांच्या पातळीवर निर्देश दिले आहेत.
या बैठकी मध्ये सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुर, कुलसचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि इतर विद्यापीठांचे कुलगुर, कुलसचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
“कॅरी ऑन” योजना म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची एक सुवर्ण संधी. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असे म्हटले आहे, जे विद्यार्थी काही कारणांमुळे आणि काही गंभीर परिस्थितीमुळे परीक्षा देण्यास जाऊ शकत नाहीत. याच परिस्थिती मध्ये “कॅरी ऑन” योजना अतिशय उपयुक्त ठरते. शैक्षणिक वर्षाचे महत्व डोळ्यासमोर ठेवता, हि योजना लागू करण्याचे निर्णय घेत असल्याचे दिसून येते. सर्व विद्यापीठांनी एकत्र येऊन विद्यार्त्यांच्या हितासाठी सुनियोजन करावे असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मत मांडले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात गॅप पडू नये आणि त्यांचे महत्वाचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी कॅरी ऑन योजनेच्या मार्फत त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे असे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील या योजनेने वाढू शकतो. कारण, या योजनेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना अपयशानंतरही आपले शिक्षण कायम सुरु ठेवता येते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठांच्या प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा निर्णय घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील पाऊल उचलत आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुरळीत होण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.