Dombivali : डोंबिवलीतील महाराष्ट्रनगरमध्ये राहणाऱ्या ५९ वर्षीय सेवानिवृत्त महिलेची तोतया पोलिसाने तब्बल ५१ लाख ३५ हजार रुपयांना फसवणूक केली. डिजिटल अटक (Digital Arrest) करण्याची भीती दाखवत या भामट्याने महिलेकडून हळूहळू पूर्ण सेवानिवृत्तीची रक्कम उकळली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
१७ जानेवारीला महिलेच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. त्याने स्वतःला कुलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने महिलेच्या बँक खात्यात गैरव्यवहार झाल्याचा दावा केला आणि काही छायाचित्रे पाठवली. महिलेला व्हिडिओ कॉलद्वारे “पोलीस वेशात” दिसणाऱ्या व्यक्तीने तिच्या नावावर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. त्याने महिलेला सांगितले की, गुन्हे मिटवण्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागेल, अन्यथा तिला अटक केली जाईल.
महिलेला आणि तिच्या कुटुंबाला धोका असल्याची भीती घालण्यात आली. महिला घाबरली आणि २० लाख, त्यानंतर ३१.३५ लाख असे दोन टप्प्यात एकूण ५१.३५ लाख रुपये भामट्याने दिलेल्या बँक खात्यावर पाठवले. फसवणूक करणाऱ्याने तिला आश्वासन दिले की, सर्व गुन्हे मिटतील आणि पैसे परत मिळतील.
संपूर्ण रक्कम पाठवूनही महिलेचे गुन्हे मिटले नाहीत, आणि पैसेही परत मिळाले नाहीत. जेव्हा तिने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पोलीस गायब झाला. यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे समजले आणि तिने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पोलीस नागरिकांना अशा फसवणुकीपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत.