आज काळ उन्हाचे तापमान खूप वाढले आहे आणि येत्या काही दिवसात तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. उन्हाचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम तर होतोच पण तुम्हाला माहित आहे का उन्हाचा आपल्या आरोग्यावर वाईट प्रकारे पण परिणाम होतो. आपल्या शरीराला जीवनसत्त्व डी मिळवण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो, परंतु जर आपण जास्त वेळ उन्हात राहिलो, तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यापैकी एक गंभीर परिणाम म्हणजे त्वचेचा कॅन्सर (Skin Cancer). उन्हात जास्त वेळ राहिल्याने अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांचा जास्त प्रमाणात संपर्क होतो, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
त्वचेच्या कॅन्सरचे प्रकार
बेसल सेल कार्सिनोमा (Basal Cell Carcinoma – BCC)
बेसल सेल कार्सिनोमा हा त्वचेच्या कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा हळूहळू वाढणारा आणि सहसा इतर अवयवांवर परिणाम न करणारा असतो. चेहरा, मान आणि हात यांसारख्या सूर्यप्रकाशाला जास्त उघड असलेल्या भागांवर हा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो. यामध्ये त्वचेवर चमकदार, गुलाबीसर किंवा मांसाच्या रंगाचे छोटे गाठ किंवा फोड दिसू शकतात, जे हळूहळू मोठे होत जातात. काहीवेळा त्यावरून रक्तस्त्राव देखील होतो. लवकर निदान झाल्यास योग्य उपचाराने हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचार न केल्यास तो त्वचेच्या खोल भागात वाढू शकतो, त्यामुळे वेळीच त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (Squamous Cell Carcinoma – SCC)
स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हा त्वचेच्या कॅन्सरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा त्वचेत खोलवर शिरू शकतो आणि वेळेवर उपचार न केल्यास शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेमध्ये असामान्य पेशी वाढून हा कॅन्सर होतो. यामध्ये त्वचेवर खडबडीत, लालसर किंवा पांढरट गाठी निर्माण होतात, ज्या काही वेळाने जखम होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये या गाठी वेदनादायक असतात आणि रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. लवकर निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कॅन्सर रोखता येऊ शकतो, परंतु दुर्लक्ष केल्यास तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो आणि गंभीर परिणाम होऊ शकतात.
मेलानोमा (Melanoma)
मेलानोमा हा त्वचेचा सर्वात गंभीर आणि धोकादायक प्रकार आहे. हा त्वचेच्या आत खोलवर जाऊन शरीरातील इतर अवयवांपर्यंत पसरू शकतो. मेलानोमामध्ये त्वचेवर गडद रंगाचे डाग, खडे किंवा असामान्य गाठी दिसतात, ज्या अनियमित स्वरूपाच्या असतात आणि हळूहळू त्यांचा रंग, आकार आणि पोत बदलतो. मेलानोमा बहुतेकदा जुन्या खड्यांमध्ये किंवा नवीन डागांच्या स्वरूपात दिसतो. खाज, वेदना, रक्तस्त्राव किंवा जळजळ ही याची प्राथमिक लक्षणे असू शकतात. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे मेलानोमा होण्याचा धोका वाढतो, विशेषतः गोऱ्या त्वचेच्या लोकांमध्ये. वेळीच निदान आणि उपचार न केल्यास हा कॅन्सर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो आणि प्राणघातक ठरू शकतो.
जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेच्या कॅन्सरची शक्यता का वाढते?
अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांचा प्रभाव :– सूर्यप्रकाशातील UV-A आणि UV-B किरणे त्वचेवर खोलवर परिणाम करतात. या किरणांमुळे त्वचेतील डीएनएचे नुकसान होते, ज्यामुळे कॅन्सरजन्य पेशींची वाढ सुरू होते. सतत UV किरणांच्या संपर्कात राहिल्यास त्वचेच्या पेशींची पुनर्रचना बिघडते आणि अनियंत्रित पेशी वाढीला लागतात, ज्यामुळे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो.
सनबर्न (Sunburn) होण्याचा धोका :– उन्हात जास्त वेळ राहिल्यास त्वचेवर लालसरपणा, जळजळ, आग आणि फोड येऊ शकतात. हे लक्षण दीर्घकाळ टिकल्यास त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते. वारंवार सनबर्न झाल्यास त्वचेतील पेशी कमकुवत होतात आणि त्यांचे पुनरुत्पादन व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढू शकतात.
उष्णतेचा त्रास आणि त्वचेवरील अतिरेक :– जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेला अतिरिक्त उष्णता मिळते, ज्यामुळे त्वचा कोरडी, सुरकुतलेली आणि कमकुवत होते. यामुळे त्वचेच्या नैसर्गिक संरक्षक थराची झीज होते, ज्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील बनते आणि कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्वचेमध्ये कोलाजेन कमी होऊन सुरकुत्या वाढतात, तसेच हायपरपिगमेंटेशन आणि त्वचेवरील असमान टोन निर्माण होतो.
त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपाय
सनस्क्रीनचा नियमित वापर करा :– बाहेर जाण्यापूर्वी किमान SPF 30 असलेली सनस्क्रीन वापरा. अधिक UV किरणांचा प्रभाव असेल तर SPF 50 वापरणे चांगले. सूर्यप्रकाशापासून बचाव करा – शक्यतो सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान सूर्यप्रकाशात जाणे टाळा, कारण या वेळी UV किरणांचा प्रभाव जास्त असतो.
संरक्षक कपडे घाला :– शक्य तितक्या अंग झाकणारे कपडे परिधान करा. टोपी आणि सनग्लासेसचा वापर केल्याने डोळे आणि चेहऱ्याचे संरक्षण होईल.
जास्त प्रमाणात पाणी प्या :– शरीरातील पाणी संतुलित ठेवा, जेणेकरून त्वचा निरोगी राहील आणि सूर्याच्या परिणामांना सामोरे जाऊ शकेल.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा :– यामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
नियमित त्वचेतज्ञांचा सल्ला घ्या – जर त्वचेवर संशयास्पद बदल आढळले, तर त्वचारोगतज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करावी.