2026 पासून सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) दहावीच्या परीक्षेत मोठा बदल होत आहे. आतापर्यंत विद्यार्थी वर्षातून एकदाच परीक्षा देत होते आणि नापास झाल्यास त्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय मिळत होता. मात्र, ही पद्धत बंद करून आता वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. या नव्या निर्णयाला अंतिम मंजुरी देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे परीक्षा देण्याचा पर्याय मिळणार आहे.
पहिली परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होईल, तर दुसरी परीक्षा मे महिन्यात घेतली जाईल. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतील, म्हणजेच विद्यार्थ्यांना अर्धा अभ्यासक्रम करून परीक्षेला बसता येणार नाही. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन (Internal Assessment) फक्त एकदाच होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एकच केंद्र मिळेल, त्यामुळे त्यांना वेगळ्या ठिकाणी जावे लागणार नाही. मात्र, या नव्या परीक्षापद्धतीसाठी विद्यार्थ्यांना अधिक परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षा दिल्या, तर त्याच्या ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील, तेच अंतिम गुण म्हणून ग्राह्य धरले जातील. त्यामुळे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात, आणि जर अपेक्षित गुण मिळाले नाहीत, तर दुसऱ्या परीक्षेत संधी मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल आणि त्यांना अधिक तयारी करण्याचा वेळ मिळेल.
सीबीएसई बोर्डाच्या या नव्या पद्धतीवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी सीबीएसई वेबसाइटवर मसुदा अपलोड करण्यात आला आहे. 9 मार्चपर्यंत शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सामान्य लोक या नव्या धोरणावर आपले मत मांडू शकतात. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 19 फेब्रुवारीलाही शिक्षण मंत्रालयात बैठक झाली होती, ज्यात सीबीएसई, एनसीईआरटी आणि केंद्रीय विद्यालय (KV) मध्ये वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याच्या संकल्पनेवर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय अंतिम करण्यात आला.
हा मोठा बदल विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यांना परीक्षेसाठी अधिक वेळ आणि संधी मिळेल. मात्र, यासाठी त्यांना योग्य नियोजन करावे लागेल. बोर्ड परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यास मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या निर्णयावर आपले मत मांडावे, जेणेकरून भविष्यातील परीक्षापद्धती आणखी सुधारता येईल.