अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात एनपीएस वात्सल्य योजना (NPS Vatsalya Yojana) अधिक आकर्षक बनवण्यासाठी मोठी घोषणा केली. या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलाच्या एनपीएस खात्यात योगदान करत असतील, तर त्यांना ५०,००० रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त करसवलतीचा लाभ मिळेल. ही सवलत आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८०CCD(1B) अंतर्गत दिली जाईल. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक केल्यास त्यांना कर कपातीचा मोठा फायदा मिळू शकतो. मात्र, हा लाभ फक्त जुनी करप्रणाली (Old Tax Regime) स्वीकारणाऱ्या करदात्यांनाच मिळेल, नवीन करप्रणालीमध्ये (New Tax Regime) ही सवलत उपलब्ध नाही.
एनपीएस वात्सल्य योजना ही खास अल्पवयीन मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पालक आपल्या मुलाच्या नावाने एनपीएस खाते सुरू करू शकतात आणि त्यामध्ये नियमित गुंतवणूक करू शकतात. मूल १८ वर्षांचे झाल्यावर हे खाते त्याच्या नावावर हस्तांतरित होते, आणि त्या वेळी जमा झालेले सर्व पैसे एनपीएस टियर-१ खात्यात वळवले जातात. पालकांनी दरवर्षी किमान १,००० रुपये गुंतवणे आवश्यक आहे, मात्र कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.
ही योजना पालकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण ती कर बचतीसह मुलाच्या भविष्यासाठी दीर्घकालीन मोठा निधी तयार करण्यास मदत करते. एनपीएस ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, जी निवृत्तीपर्यंत आर्थिक सुरक्षितता देते. त्यामुळे, जे पालक आपल्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छितात आणि कर कपातही करायची आहे, त्यांच्यासाठी एनपीएस वात्सल्य योजना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.