कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अनधिकृत बांधकामांविरोधात आक्रमक झाली असून, डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात उद्यानाच्या जागेवर उभारलेल्या पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आला. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. डोंबिवली खंबाळपाडा परिसरातील रहिवाशांनी या बेकायदा इमारतीबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. या जागेचा मूळ वापर उद्यानासाठी होणार होता, मात्र काही बिल्डर आणि स्थानिक दलालांनी संगनमत करून येथे अनधिकृत बांधकाम उभारले. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत केडीएमसी प्रशासनाने संबंधित इमारतीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी सकाळीच केडीएमसीच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. पाच मजली इमारतीतील फ्लॅट विकत घेतलेल्या रहिवाशांना नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र काहींनी इमारतीत वास्तव्यास येण्यास सुरुवात केली होती. अखेर, नियोजन करून महापालिकेने मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी, पोलीस आणि बुलडोझरच्या मदतीने कारवाई केली. केडीएमसीने यापूर्वीही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे पाडली आहेत, मात्र अजूनही कल्याण-डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. महापालिकेच्या सततच्या कारवाईनंतरही अनेक ठिकाणी बेकायदा इमारती उभ्या राहात असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे.
या कारवाईबाबत नगरसेवकांनी आणि स्थानिक नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी कारवाई उशिरा झाल्याचे मत मांडले. भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना वेळीच आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.