MHADA : अर्जदार सुनावणीस गैरहजर, ६ मार्चला शेवटची संधी

माय मराठी
2 Min Read

मुंबई: म्हाडाच्या (MHADA) मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झालेल्या पैशांच्या उधळण प्रकरणाची चौकशी विशेष समिती करत आहे. या चौकशीअंतर्गत समितीने २७ फेब्रुवारी रोजी ११ अर्जदारांना सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र, त्या दिवशी एकही अर्जदार हजर झाला नाही. त्यामुळे समितीने आता ६ मार्च रोजी पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाने अर्जदारांना या दिवशी हजर राहण्याचे आवाहन केले असून, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी असेल, असा इशाराही दिला आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील ११ संक्रमण शिबिरातील रहिवाशांना नवीन शिबिरात जागा मिळाल्या नाहीत. म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाने तब्बल २० वर्षे त्यांना गाळ्यांपासून वंचित ठेवले, असा आरोप करत एका महिलेने १४ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील म्हाडा भवनात अनोखे आंदोलन केले. तिने सहमुख्य अधिकारी उमेश वाघ यांच्या दालनात गळ्यात पैशांची माळ घालून नोटांची उधळण केली आणि वाघ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.

ही बाब गंभीर मानत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ११ गाळ्यांच्या वितरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि यासाठी विशेष समिती स्थापन केली. समितीने अर्जदारांची पात्रता ठरवण्यासाठी त्यांना सुनावणीसाठी बोलावले, पण एकही अर्जदार हजर झाला नाही.

म्हाडाने अर्जदारांच्या नोंदणीकृत पत्त्यावर कर्मचारी पाठवून त्यांना सूचनापत्र देण्याचा प्रयत्न केला. पण अर्जदार त्या पत्यावर सापडले नाहीत, त्यामुळे पत्र देता आले नाही. त्यामुळे म्हाडाने आता वर्तमानपत्रात अर्जदारांची नावे प्रसिद्ध करून त्यांना २७ मार्चपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे.

गुरुवारी हे अर्जदार सुनावणीस येतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, अर्जदार उपस्थित न राहिल्याने आणि आंदोलन करणाऱ्या महिलेचे नाव अर्जदारांमध्ये नसल्याने म्हाडामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more