गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वीज दरांमुळे राज्यातील नागरिकांना आणि उद्योगांना मोठा आर्थिक (Maharashtra Budget 2025) बोजा सहन करावा लागत आहे. विशेषतः करोना लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांना जास्त वीजबिल भरावे लागले होते. त्यामुळे प्रत्येक सरकारला या प्रश्नाला तोंड द्यावे लागले. याच पार्श्वभूमीवर, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी वीज दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2025 च्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी सांगितले की, महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी वीज दर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (MERC) सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि स्वस्त हरित ऊर्जा खरेदीमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दरही कमी होतील.
अर्थसंकल्पात मुंबईतील वाहतूक सुधारण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. वर्सोवा ते मढ, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या महत्त्वाच्या भुयारी मार्गांसाठी एकूण ₹64,783 कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याशिवाय ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारा उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि आसपासची महत्त्वाची शहरे थेट विमानतळाशी जोडली जातील. तसेच, बाळकुंभ ते गायमुख किनारी मार्ग हा 13.45 किमी लांबीचा प्रकल्प ₹3,364 कोटी खर्चून 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
गावांमधील रस्ते सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात 9,610 किमी रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येईल. ही कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, 7,000 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी 3,582 गावे 14,000 किमी सिमेंट काँक्रीट रस्त्यांद्वारे राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा महामार्गांशी जोडली जातील. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹30,100 कोटी असून, पहिल्या टप्प्यात ₹8,000 कोटींची गुंतवणूक केली जाईल.