Aadhar Card: नवीन आधार ॲप नेमकं कसं काम करणार? फायदा काय होणार

माय मराठी
3 Min Read

आधार कार्डसाठी (Aadhar Card) एक नवीन खास ॲप लॉंच करण्यात आलंय. हे ॲप युजर्सच्या डेटाची गोपनीयता राखणार आहे. तसेच त्यांना आधार कार्ड किंवा त्याचा फोटो कुठेही घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार (New Aadhar App) नाही. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात या नवीन अ‍ॅपबद्दल माहिती दिली आहे. हे ॲप नेमकं कसं काम करणार? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.

केंद्रिय मंत्र्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधार प्रमाणीकरणासाठी नवीन ॲप लाँच झाल्यानंतर, वापरकर्त्यांना हॉटेलपासून विमानतळापर्यंत कुठेही आधार कार्ड (Aadhar Card) किंवा त्याचा फोटो घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही. हे ॲप सध्या बीटा व्हर्जनमध्ये आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) त्याची चाचणी करत आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये हे नवीन आधार ॲप (Aadhar Card) कसे काम करते? ते दाखवले आहे. पोस्टमध्ये त्यांनी नवीन आधार ॲप, मोबाईल ॲपद्वारे फेस आयडी ऑथेंटिकेशन असं लिहिलंय. यासोबतच त्यांनी नो फिजिकल कार्ड आणि नऊ फोटोकॉपीज असे शब्द वापरले आहेत.

ॲप कसं वापरायचं?

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, सुरूवातीला एक क्विक रिस्पॉन्स कोड (QR कोड) स्कॅन करावा लागेल, त्यानंतर ॲप सेल्फी कॅमेऱ्याद्वारे आपला चेहरा स्कॅन करेल. माहितीनुसार, या प्रमाणीकरणात फक्त आवश्यक असलेले मूलभूत तपशील शेअर केले जातील. सध्या, आधार कार्ड स्कॅन केल्यावर किंवा त्याची प्रत दिल्यावर, आधार कार्डवर छापलेले सर्व तपशील त्या व्यक्ती किंवा एजन्सीपर्यंत पोहोचतात.

खरं तर, विमानतळासह अनेक ठिकाणी लोकांना त्यांचे आधार कार्ड किंवा त्याचा फोटो सोबत ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत, जर आधार कार्डधारकाने त्या आधार कार्डची प्रत दुसऱ्याला दिली, तर आधार कार्डवर छापलेले सर्व तपशील त्या व्यक्ती किंवा एजन्सीपर्यंत पोहोचतात. अशा परिस्थितीत, इतर कोणतीही व्यक्ती किंवा सायबर फसवणूक करणारा आधारवर छापलेल्या तपशीलांचा गैरवापर करू शकतो. आपले आर्थिक नुकसान देखील करू शकतो.

नवीन आधार अ‍ॅपचा काय फायदा ?

नवीन आधार ॲप आल्यानंतर, तुमच्या आधार कार्डची माहिती पूर्णपणे सुरक्षित राहील. यामुळे आपल्या आधार कार्डशी संबंधित डेटा लीक होणार नाही, याची खात्री होईल. नवीन अ‍ॅपवरील प्रमाणीकरण प्रक्रियेमुळे केवळ त्या व्यक्तीला किंवा एजन्सीला आवश्यक असलेले तपशीलच उपलब्ध होतील.

नवीन आधार अ‍ॅपमध्ये काय खास ?

नवीन आधार ॲपद्वारे फेस आयडी आणि क्यूआर स्कॅनिंगद्वारे डिजिटल पडताळणी केली जाईल. नवीन आधार अ‍ॅपमुळे वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय डेटा शेअर केला जाणार नाही, गोपनीयता वाढेल. आता पडताळणीसाठी कागदपत्राची छायाप्रत देण्याची आवश्यकता राहणार नाही. हॉटेल्स आणि विमानतळांवर फोटोकॉपी देण्याची आवश्यकता राहणार नाही.

नवीन आधार अ‍ॅपसह फसवणूक किंवा संपादनाला वाव राहणार नाही. नवीन आधार ॲप गुगल प्ले स्टोअरवर लाँच झालंय की नाही, याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित सर्व चाचणी पूर्ण झाल्यानंतर हे ॲप्स प्ले स्टोअरवर रिलीज केले जातील. दरम्यान जर कोणी तुम्हाला कॉल करून नवीन ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले, तर सावधगिरी बाळगा. नेहमी अधिकृत ॲप स्टोअरवरूनच ॲप डाउनलोड करा.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more