जम्मू-काश्मीरमधील (Pahalgam Attack) पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण जखमी झाले. प्रसिद्ध बॉलिवूड गायक सलीम मर्चंट यांनी या घटनेबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “मला मुस्लिम असल्याची लाज वाटू लागली आहे,” असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
बैसरन खोऱ्यातील एका टेकडीवरून दहशतवादी उतरले आणि पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी ४० पर्यटकांना घेरले आणि त्यांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि त्यांच्यावर गोळीबार केला.
या व्हिडिओमध्ये सलीम म्हणाले, “पहलगाम मारले गेलेले निष्पाप लोक मुस्लिम नसून हिंदू असल्याने मारले गेले. तर दहशतवादी मुस्लिम आहेत का? नाही, ते दहशतवादी आहेत.
कारण इस्लाम हे शिकवत नाही. कुराण शरीफच्या सुरा अल-बकराच्या २५६ व्या आयतमध्ये म्हटले आहे की धर्मात कोणतीही सक्ती नाही. कुराण शरीफमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे.”
“एक मुस्लिम म्हणून, निष्पाप हिंदू बंधू-भगिनींना हिंदू असल्याने निर्दयीपणे मारले गेले हे पाहून मला लाज वाटते. हे सर्व कधी संपेल? गेल्या दोन-तीन वर्षांपासून काश्मीरमध्ये लोक खूप चांगले राहत होते. आता त्यांना पुन्हा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबद्दल माझे दुःख आणि राग कसा व्यक्त करावा हे मला कळत नाही,” असे ते पुढे म्हणाले.
विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सलीम मर्चंटचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “मी माझे डोके टेकवतो आणि जीव गमावलेल्या निष्पाप लोकांसाठी प्रार्थना करतो. देव त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो.” कला जगतातील इतर अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दहशतवाद्यांना पकडण्याची आणि त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणीही केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे जेणेकरून केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली जाईल. या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगाम हल्ल्याची सविस्तर माहिती सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना देतील.