बालाकोट सर्जिकल स्ट्राईकद्वारे भारताने स्पष्ट इशारा दिला होता की जर यापुढे असं काही करण्याचा प्रयत्न केलात तर त्याचे परिणाम यापेक्षा घातक होतील. मात्र सुधारेल तो पाकिस्तान कसला… २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी पहलगाम (Pahalgam) हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी त्यांच्या क्रूरतेचा कळस गाठला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना धडा शिकवण्याचा थेट इशारा दिला आहे. त्याची पहिली झलकही दिसून आली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन स्थानिक दहशतवाद्यांना पहिला धक्का बसला.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक दहशतवादी आदिल हुसेन ठोकरचे घर सुरक्षा दलांनी उडवून दिले. त्याचे घर अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील घोरी भागात होते. आदिल ठोकरला आदिल गुरी म्हणून ओळखले जाते. पहलगामच्या बैरसन व्हॅली परिसरात पर्यटकांवर हल्ला करण्याचे नियोजन आणि हल्ला करण्यात आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्यात तो आघाडीवर होता असे वृत्त आहे. दरम्यान, हल्ल्यात सहभागी असलेला आणखी एक दहशतवादी आसिफ शेख याचे त्राल येथील घर जम्मू-काश्मीर प्रशासनाने बुलडोझरने पाडले.
लष्कराच्या सूत्रांनुसार, स्टीलच्या गोळ्या, एके-४७ रायफल आणि बॉडी कॅमेरे असलेल्या चार दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केला. हा हल्ला ६ जणांनी केल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी चार पाकिस्तानी आणि दोन स्थानिक असल्याचे वृत्त आहे. लष्कर-ए-तोयबाच्या एका गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवर त्यांच्या धर्माबद्दल विचारणा केल्यानंतर गोळीबार केला. यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांना रोखणाऱ्या स्थानिक मुस्लिमांवरही गोळीबार करण्यात आला. या दहशतवाद्यांमध्ये आदिल हुसेन ठोकर आणि त्रालचा रहिवासी आसिफ शेख यांचा समावेश होता.
लष्कराच्या सूत्रांनुसार, आदिल २०१८ मध्ये अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात घुसला होता. पाकिस्तानच्या प्रवासादरम्यान त्याने एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतले होते. तो गेल्या वर्षीच जम्मू-काश्मीरमध्ये परतला होता. पहलगाम हल्ल्यादरम्यान हे दहशतवादी पश्तोमध्ये संवाद साधत असल्याचे उघड झाले. सुरुवातीला हे सर्व दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे उघड झाले होते. पण नंतर असे उघड झाले की त्यांना दोन स्थानिकांनी मदत केली होती. लष्कर-ए-तोयबाच्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यांच्या मते, या दहशतवाद्यांनी अनेक दिवसांपूर्वी नियंत्रण रेषा ओलांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ एप्रिल रोजी कटारा दौऱ्यादरम्यान त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कडक सुरक्षा व्यवस्था पाहून त्यांनी तो थांबवला. दहशतवादी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्याच्या तयारीत होते.