पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ रणगाड्यांची मोठी तुकडी पाठवली आहे. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान हादरला आहे. आता झेलम नदीच्या प्रवाहामुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाणी शिरल्याने महापूर आला आहे. प्रशासनाने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. तेथील माध्यमे भारताला दोष देत आहेत.
तेथील माध्यमे दावा करत आहेत की भारताने झेलम नदीत अचानक पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानात मोठा पूर आला आहे. झेलम नदीला आलेल्या पुरामुळे मुझफ्फराबाद परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानी प्रशासनाने या भागात आलेल्या पूरस्थितीसाठी भारताला जबाबदार धरले आहे.
पाकिस्तानी माध्यमांनुसार, अचानक पाणी सोडल्यामुळे मुझफ्फराबाद परिसरातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुरामुळे हत्तीयन बाला परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना मशिदींमधून बाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. झेलम नदीचे पाणी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शिरले आणि पाकव्याप्त काश्मीरमधील चकोठी भागात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर, पाकिस्तानच्या अनेक भागात पुराचा प्रादुर्भाव झाला.
दरम्यान, भारताने पाकिस्तानला सिंधू पाणी करार रद्द केल्याची अधिकृत माहिती दिली आहे. या संदर्भात पाकिस्तानला औपचारिक सूचना देण्यात आली आहे. गुरुवारी, या संदर्भातील कागदपत्रे पाकिस्तानला सुपूर्द करण्यात आली. पाण्याची पातळी, एकूण पाणीसाठा, पाणी सोडण्याच्या सूचना, नवीन पाणी प्रकल्प, त्यासंबंधी बैठका, आकडेवारी किंवा पाण्याबद्दलची कोणतीही माहिती यासंबंधीचे सर्व नियम आणि आक्षेप रद्द करण्यात आले आहेत. आता हा करार रद्द झाल्यामुळे, भारताला नवीन पाणी प्रकल्प राबविण्यासाठी पाकिस्तानची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करत आहे. या भागात सतत गोळीबार सुरू आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या हालचाली वाढल्या आहेत. सीमेवर रणगाडे तैनात केले जात आहेत.