Ulhasnagar : आंदोलन, घोषणाबाजी, होमहवन आणि गेटवरून महापालिकेत घुसण्याचा थरार

माय मराठी
3 Min Read

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) नागरिकांना आठवड्याला एकदाच पाणी, ते देखील अपुरे आणि अनेकदा दूषित… पण दुसरीकडे महापालिका मात्र पाणीपट्टीत दरवर्षी भरमसाठ वाढ करतच राहते आहे. प्रशासनाच्या या बेफिकीरीला आता संतप्त जनतेने आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेवर धडक देत उत्तर दिलं. आंदोलन, घोषणाबाजी, होमहवन आणि गेटवरून महापालिकेत घुसण्याचा थरार यावेळी पाहायला मिळाला. परिणामी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर तणाव, गोंधळ, आणि शिवसैनिक, पोलीस व सुरक्षारक्षकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. उल्हासनगर शहराला सतावणारी तीव्र पाणीटंचाई, नागरिकांच्या घशाला कोरडं पडणारं प्रशासन आणि त्याच वेळी पाणीपट्टीत केलेली भरमसाठ दरवाढ… या तिढ्यात सापडलेले नागरिक आता थेट आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने शुक्रवारी उल्हासनगर महापालिकेवर जोरदार हल्लाबोल करत धरणे आंदोलन, होमहवन आणि घोषणाबाजी केली. जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर झालेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिक आणि नागरिकांनी सहभाग घेतला.

जर लवकरात लवकर नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा केला गेला नाही, तर हे आंदोलन केवळ महापालिकेपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर अधिक व्यापक आणि तीव्र होईल, असा ठाम इशारा जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहरप्रमुख कुलविंदर सिंह बैस उर्फ बिंदरभाई, विधानसभा संघटक शिवाजी जावळे, कृष्णा पुजारी, उपशहरप्रमुख शेखर यादव, दिलीप मिश्रा, महिला शहर संघटिका जया तेजी, विभागप्रमुख बापू सावंत, उपविभागप्रमुख प्रा. प्रकाश माळी, भाऊसाहेब सावंत, संजय शेलार, विभाग संघटक निवृत्ती पाटील, हृषीकेश घाडगे यांच्यासह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाचे हे आंदोलन केवळ राजकीय नव्हे, तर जनतेच्या जीवनावश्यक हक्कासाठीचा आक्रोश आहे. उल्हासनगरकर आता प्रशासनाच्या आश्वासनांना थकले असून, निर्णायक कृतीच्या प्रतीक्षेत आहेत. पाणी हा हक्क आहे, आणि तो हिरावला गेला तर आंदोलनाची लाट थांबणार नाही, हे आजच्या मोर्चातून स्पष्टपणे दिसून आले. या आंदोलनाचे विशेष आकर्षण ठरले ते होमहवन. प्रशासनाला सद्बुद्धी यावी, यासाठी मंत्रोच्चार आणि अग्नीसमोर प्रार्थना करण्यात आली. “पाणी द्या, अन्यथा आम्ही थांबणार नाही”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसैनिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रखर टीका केली आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवल्या नाहीत, तर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.

आंदोलनाच्या दरम्यान महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी गेट बंद करताच शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला, काही जण आतही घुसले. त्यानंतर पोलीस, सुरक्षारक्षक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. काही काळ महापालिका परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील अनेक भागांत पाणी आठवड्यातून एकदाच येते, तोही दूषित. महिलांना व लहान मुलांना पाणी आणण्यासाठी हंडे घेऊन रांगेत उभे राहावे लागते. याशिवाय शहरात सुरू असलेल्या रस्ते, गटारी व सीसीटीव्ही कामांचे खोदकाम अर्धवट अवस्थेत असून त्यामुळे अपघात वाढले आहेत. हे सर्व प्रश्न आंदोलकांनी ठळकपणे मांडले.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more