डोंबिवली (शंकर जाधव)
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर परब (Nandkishore Parab) यांची कल्याण डोंबिवली भाजप जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकिशोर परब (Nandkishore Parab)यांच्या नियुक्तीमुळे डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थक डोंबिवली ग्रामीण जनसंपर्क कार्यालयात जमा होऊन फटाक्यांची आतषबाजी केली आणि नंदू परब यांचे जोरदार स्वागत केले.
नंदकिशोर परब यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीला “कोकणची मोहोर” लागल्याचे सांगितले जात आहे. ते भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. डोंबिवली आणि कल्याणमध्ये भाजपाची वाढ आणि त्याच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी ३६५ दिवस निरंतर मेहनत केली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे ते भाजपाचे एक विश्वासार्ह आणि कट्टर कार्यकर्ता ठरले आहेत.
नंदकिशोर परब यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल कार्यालयात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. २००७ पासून भाजपा पार्टीचे सक्रिय सदस्य असलेले नंदकिशोर परब यांनी विविध पदांवर कार्यरत राहून पक्षाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे.
भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष कर्ण जाधव, नागेश शर्मा, संतोष शुक्ला, महादुसिंग राणा, दत्ता माळेकर यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नंदकिशोर परब यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात भाजपाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नंदकिशोर परब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण जिल्ह्यात भाजपाचा अजून मजबूत आधार तयार होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.