डोंबिवली (Dombivli) (शंकर जाधव)
डोंबिवलीतील (Dombivli) स्व. हेमंत जोशी यांचा सुपुत्र ध्रुव हेमंत जोशी याने दहावीच्या परीक्षेत ८०% टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ध्रुव डोंबिवलीच्या ओमकार इंटरनॅशनल स्कूल या नामांकित शाळेचा विद्यार्थी आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हेमंत जोशी यांना आपला प्राण गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेच्या वेळी ध्रुव स्वतःही तेथेच उपस्थित होता. केवळ वडिलांचा मृत्यूच नव्हे, तर या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन जिवलग नातेवाईकांचाही मृत्यू झाला – मोने, लेले, आणि जोशी कुटुंबातील सदस्यांचा.
हल्ल्यानंतर ध्रुव आणि त्याचा मावस भाऊ हर्षल संजय लेले यांनी अत्यंत धैर्याने परिस्थितीचा सामना केला. त्यांनी ध्रुवची मावशी कविता संजय लेले यांना (हर्षलच्या आई व स्व. संजय लेले यांच्या पत्नी) जखमी अवस्थेत सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांच्या या धाडसाचे आणि समजूतदार वागणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ह्या धक्कादायक अनुभवातून सावरत ध्रुवने शिक्षणात लक्ष केंद्रित करत दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. एका अपघाती घटनेनंतरही ध्रुवने दाखवलेली मानसिकता आणि चिकाटी ही खरोखरच प्रेरणादायक आहे. जोशी कुटुंबीयांचे दुःख अजूनही ताजे असतानाही ध्रुवचे हे यश त्यांच्या जिद्दीचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक ठरत आहे.
डोंबिवली परिसरातील शिक्षक, शाळा प्रशासन, नातेवाईक व समाजमाध्यमांवरून ध्रुववर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हेमंत जोशी यांची सेवा, त्याग आणि आता ध्रुवची जिद्द – हे सगळं एकत्र मिळून एका असामान्य कथेचे दर्शन घडवतात.