डोंबिवली (Dombivli) (प्रतिनिधी : शंकर जाधव)
द्रुष्टी दोषासारख्या शारीरिक अडचणीवर मात करत, अपार जिद्द, निष्ठा आणि अभ्यासाच्या जोरावर शार्दुल संतोष औटी या विद्यार्थ्याने माध्यमिक शालांत परीक्षा (मार्च २०२५) मध्ये तब्बल ९७.८०% गुण मिळवले असून, टिळकनगर (Dombivli) शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शार्दुल वयाच्या केवळ ३व्या वर्षापासून दृष्टीदोषाने ग्रासलेला आहे. त्याच्या डोळ्यांचे दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सध्या त्याला केवळ एका डोळ्यातच मर्यादित दृष्टी आहे. इतकं असूनही शार्दुलने दहावीच्या परीक्षेत कोणतीही विशेष सवलत न घेता इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देऊन हे घवघवीत यश संपादन केले आहे.
त्याची ही यशोगाथा केवळ गुणांपुरती मर्यादित न राहता, ही एक प्रेरणादायी कथा आहे — आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि अपराजित इच्छाशक्तीची. शार्दुल सध्या विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन IIT साठी संगणक अभियांत्रिकीचे स्वप्न पाहत आहे. त्यासाठी तो योजनाबद्ध तयारीला लागला आहे.
या यशामध्ये त्याचे पालकांचे प्रेमळ पाठबळ, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शार्दुलचा अभ्यासातील सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे प्रशासक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर पालकांनी शार्दुलच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
शार्दुलचे यश हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक दीपस्तंभ ठरेल, हे नक्की.