डोंबिवली (Dombivli) (प्रतिनिधी : शंकर जाधव)
डोंबिवली (Dombivli) पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त असून, यामागे महापालिका प्रशासनाची काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजनबद्ध पुनर्वसन धोरण कारणीभूत ठरले आहे. स्थानिक नागरिकांनी याबद्दल ‘ह’ प्रभागाचे क्षेत्र पथकप्रमुख विजय भोईर आणि त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
पूर्वी या भागात असलेले फेरीवाले विष्णुनगर पोस्ट ऑफिसजवळील जागेत पुन्हा स्थायिक करण्यात आले. त्यानंतर, स्टेशन परिसरात १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सातत्याने केली जात आहे.
पथकप्रमुख विजय भोईर हे नियमितपणे परिसराची पाहणी करून स्टेशनबाहेरील स्वच्छता, मोकळेपणा आणि नागरिकांच्या सोयीसाठी फेरीवाल्यांना परत येऊ न देण्यावर लक्ष ठेवत आहेत. यामुळे नागरिकांना फेरीवाल्यांमुळे होणारी अडथळ्यांची समस्या दूर झाली आहे.
स्थानक परिसरात काही वाहने अनधिकृतपणे उभी राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. यावर उपाय म्हणून महापालिकेने स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर ‘पार्किंग नको’ अशा सूचना फलकांची उभारणी केली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सहकार्य करण्याचे आवाहनही विजय भोईर यांनी केले आहे.
नागरिकांच्या मते, फेरीवालामुक्त परिसर आणि नियोजित वाहतूक व्यवस्था ही डोंबिवलीच्या शहरविकासासाठी एक सकारात्मक पायरी ठरली आहे.