पालघर (प्रतिनिधी : संदीप साळवे)
जव्हार (Jawhar) तालुक्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे घरकुल लाभार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवार आणि बुधवारच्या दुपारी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे.
राज्यात घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांमध्ये अनेक लाभार्थ्यांची घरे छप्परविरहित असून, उघड्यावर असल्याने त्यात पावसाचे पाणी शिरून अन्नधान्य, अंथरुण-पांघरुण भिजले आहे. अनेक कुटुंबांना चूल पेटवायला जागा उरलेली नाही, परिणामी काहीजण उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
जव्हार शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून, गटारे तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यांवर वाहू लागले आहे. नदी नाले ओसंडून वाहू लागले असून, दुर्गंधी पसरल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
वादळामुळे वीज पुरवठ्यात वारंवार खंड येत आहे. नागरिकांच्या मते, लाईटचा लपंडाव सुरू असून, वीज उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.
सततच्या पावसामुळे आंबा बागांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. घरकुलाच्या बांधकामासाठी साठवलेले साहित्यही वाया गेले असून, चौथ्याचिवाडीमध्ये काही घरांची छप्परे उडाल्याने परिस्थिती बिकट बनली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदतीसाठी पावले उचलावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तहसीलदार लता धोत्रे यांनी नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती दिली असून, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.