पालघर (प्रतिनिधी – संदीप साळवे) (SSC)
श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलित एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, हिरडपाडा यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये उल्लेखनीय दुहेरी यश संपादन केले आहे.या संस्थेच्या दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांनी यंदाही 100% निकालाची परंपरा कायम राखली असून, सलग दहा वर्षे शंभर टक्के निकाल देणाऱ्या संस्थेचा हा अभिमानास्पद टप्पा आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान अंतर्गत ३१९८ शाळांमधून जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावत, शाळेने तालुक्यात मानाचं स्थान पटकावले आहे. या दुहेरी यशामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात गगनगिरी आश्रमशाळेने आदिवासी, दुर्गम भागात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
या यशामागे संस्थेचे अध्यक्ष दिलीप नारायण पटेकर, सचिव ज्योती दिलीप पटेकर आणि सदस्य नकुल दिलीप पटेकर यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि कार्यतत्परता आहे.शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक शिक्षण, तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपक्रमांचे आयोजन ही शैक्षणिक दर्जा उंचावणारी महत्त्वाची साधने ठरली आहेत.
मुख्याध्यापक गणेश श्रीकृष्ण उदावंत यांचे योग्य नेतृत्व आणि अथक प्रयत्न, तसेच शिक्षक वृंदाचा समर्पित सहभाग हे या यशाचे बळ आहेत.शाळेने आधुनिक तंत्रज्ञान, सराव परीक्षा, रात्र अभ्यासिका आणि जादा तासिका यांचा प्रभावी उपयोग करत विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.या सर्वांचे फलित म्हणजे विद्यार्थ्यांची उज्वल कामगिरी व शाळेचा वाढता शैक्षणिक दर.