पेण ( अरविंद गुरव )
एसटी प्रशासनाने MSCIT व टायपिंग च्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करून टायपिंगच्या विद्यार्थ्यांना एसटीचा पास सढळहस्ते वाटून MSCIT ज्या विद्यार्थ्यांना मात्र पास देण्यास नकार देऊन एसटी प्रशासनाने MSCIT च्या विद्यार्थ्यांना सावत्र वागणूक दिली आहे. एसटी प्रशासनाच्या या भूमिकेमुळे हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला आहे. विद्यार्थी पासला 66.67% सवलत असते परंतु सध्या या विद्यार्थ्यांना एसटी चे पूर्ण टिकीट काढून प्रवास करावा लागत आहे.
शासनाने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटर ज्ञानाकरिता महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत MSCIT चे प्रशिक्षण राज्यभर सुरू केले आहे. MSCIT कोर्स शासन मान्य असल्याने या प्रशिक्षणाचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थी दरवर्षी घेत आहेत. केवळ रायगड जिल्ह्यात २०२३ ला १७,७७३, वर्षे २०२४ ला १५,९५९ तर मागील वर्षी २०२४ ला ९,६६९ विद्यार्थ्यांनी MSCITच्या कोर्सच्या सहाय्याने कॉम्प्युटरचे ज्ञान घेतले आहे. शासकीय नोकरी करिता हा कोर्स करणे केले असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थी हा कोर्स दरवर्षी करतात.
पेण शहरात MSCIT चे प्रशिक्षण देणाऱ्या ६ संस्था आहेत. या संस्थांमध्ये तालुक्यातील हजारो विद्यार्थी कॉम्प्युटरचा MSCIT कोर्स शिकण्याकरता येतात. परंतु पेण एसटी डेपो तीन अधिकाऱ्यांनी व पेण रामवाडी येथील रायगड विभागीय कार्यालयतील अधिकाऱ्यांनी शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून एसटी प्रशासनाने MSCIT च्या हजारो विद्यार्थ्यांना ठेवले पास पासून वंचित ठेवले आहे. शासन निर्णय क्रमांक एसटीसी -१०१७/ प्र. क्र. ५२५/परि-१ दिनांक ९ ऑक्टोबर २०१८ नुसार १९८६ पुर्वी १९८६ नंतर तंत्र व व्यावसायिक शिक्षणा अंर्तगत सुरू झालेले विविध अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थींना एसटीचा विद्यार्थी पास देण्याची मान्यता देण्यात आली आहे. असे असताना देखील पेण शहरातील काही टायपिंग संस्थांनी पेण एसटी स्थानकात तक्रार अर्ज देऊन MSCIT विद्यार्थ्यांचे पास बंद करायला लावले. MSCIT च्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान देताना कॉम्प्युटर टायपिंग शिकवलीच जाते. त्यामुळे केवळ टायपिंग शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे.
MSCIT च्या विद्यार्थ्यांचे सवलत पास बंद केल्यानंतर त्यांनी एसटीचा ३ महिन्याचा पास काढून प्रवास करावा असा अजब सल्ला पेण एसटी स्थानकाचे डेपो मॅनेजर अपर्णा वर्तक यांनी दिला आहे.
सदरच्या परिपत्रकानुसार केवळ आयटीआय चे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि व टायपिंग सारखे तांत्रिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हा पास द्यायचा आहे असा शासन परिपत्रकाचा आजब अर्थ लावून विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी MSCIT च्या विद्यार्थ्यांना पास न देण्याचा पवित्रा घेतला आहे.
विद्यार्थ्यांना सवलत पास दिल्यावर ६ किलोमीटरच्या प्रवासच्या महीन्याच्या पास करीता विद्यार्थींना केवळ १० दिवसांचे भाडे आकारून रू. २२० ला पास दिला जातो. ३ महिन्याला विद्यार्थ्यांना पास करिता ६६० रुपये लागतात. तर ह्याच प्रवासा करीता तीन महिन्याचे एसटीचा रेगुलर पास काढला तर ११०० रुपये भरावे लागतात. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना ४४० रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. प्रवासाची किलोमीटर वाढल्यानंतर आर्थिक फटकाही वाढत जात आहे.