डोंबिवली (Dombivli) (प्रतिनिधी – शंकर जाधव)
डोंबिवली (Dombivli) महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेठी मर्यादितच्या 2025-2030 या कार्यकालासाठी झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत *’एकता पॅनल’*ने दणदणीत विजय मिळवत सर्वच पदांवर आपली छाप सोडली. विशेष म्हणजे तब्बल 58 वर्षांनंतर ही निवडणूक पार पडल्यामुळे पतपेठीच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
ही निवडणूक पूर्व डोंबिवलीतील क्रीडा संकुलाजवळील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात पार पडली. एकता पॅनलने सुरुवातीपासूनच आघाडी घेत, पूर्ण संचालक मंडळावर वर्चस्व प्रस्थापित केले. विजयाची औपचारिक घोषणा गुरुवार, 15 मे रोजी करण्यात आली. त्यानंतर एकता पॅनलच्या बैठकीत विजय भोईर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
पश्चिम डोंबिवलीतील पतपेठीच्या मुख्य कार्यालयात विजय भोईर यांनी अध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. या प्रसंगी पतपेठीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय भोईर यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पुढील कार्यकारी समितीची रचना पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली:
अध्यक्ष: विजय भोईर
उपाध्यक्ष: शरद पांढरे
कोषाध्यक्ष: अनघा पवार
सचिव: गणेश गोल्हे
नवनिर्वाचित अध्यक्ष विजय भोईर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सेवक वर्गाच्या हितासाठी पारदर्शक आणि सदस्याभिमुख कारभार ठेवणार आहोत. पतपेठीला आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत करत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर दिला जाईल.”
पतपेठीतील ही निवडणूक केवळ सत्ताबदलाचे प्रतीक नसून, ती एका नव्या युगाची सुरुवात आहे, असा विश्वास सदस्यांमध्ये दिसून आला.