डोंबिवली (Dombivli) (शंकर जाधव)
शालेय पुस्तके रद्दीत देऊ नका, ती गरजू विद्यार्थ्यांना द्या या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपशहरप्रमुख संजय पाटील यांनी डोंबिवलीकरांना (Dombivli) एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. या उपक्रमाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक गरीब विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षणासाठी मदतीचा हात मिळत आहे.
संजय पाटील यांनी मार्च-एप्रिल महिन्यात, विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर एक सामाजिक आवाहन केलं होतं. त्यांनी सांगितलं की, “रू. 1000 ची पुस्तके फक्त 20 रुपयांत रद्दीत विकण्यापेक्षा, ती गरजूंना द्या. यामुळे शिक्षणाचा बोजा कमी होईल आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल.”
या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीतील नागरिक आपल्या घरी असलेल्या के.जी. ते पी.जी. पर्यंतच्या जुन्या शैक्षणिक पुस्तकांचा संग्रह करून पाटील यांच्या कार्यालयात पोहोचवत आहेत. संजय पाटील यांनी स्पष्ट केले की, “ही सर्व पुस्तके लवकरच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जातील.”
त्यांच्या कार्यालयात पुस्तकांचा ढीग जमा होत असून, गरजू पालकही याचा लाभ घेत आहेत. या उपक्रमामुळे फक्त गरजूंना मदत होत नाही, तर शिक्षणाच्या वाटचालीत समाज एकत्र येतो, ही या मोहिमेची खरी जमेची बाजू आहे.
संजय पाटील यांनी या उपक्रमाला साथ दिलेल्या डोंबिवलीकरांचे आभार मानले असून, त्यांनी सांगितले की, “एक हात मदतीचा – तुमचा आणि आमचा – मिळून आपण एक चांगले कार्य करू शकतो.”