राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली असून, सोमवारी मुंबईत देखील जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील महत्त्वाची शासकीय रुग्णालये – जे.जे. रुग्णालय आणि केईएम रुग्णालय – मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने अडचणीत आली. रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना गुडघाभर पाण्यातूनच ये-जा करावी लागली.
जे.जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि बाह्यरुग्ण विभागामधील भागात सकाळपासूनच पाणी साचले होते. यामुळे सकाळच्या पाळीतील कर्मचाऱ्यांना तसेच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. एमआरआय, सीटी स्कॅनसारख्या तपासण्यांसाठी रुग्णांना पाण्यात उभं राहून तारीख घ्यावी लागली.
सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्यामुळे या भागातील जलनिच्छारण प्रणालीवर ताण वाढला आहे. रुग्णालयाचा स्तर रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली असल्यामुळे आणि गटारे भरून वाहत असल्याने पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी, जे.जे. पोलीस ठाण्याजवळील परिसर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवार व निवासी इमारतींसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
दुसरीकडे, केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या परिसरातही पावसाचे गंभीर परिणाम दिसून आले. रस्त्यावर गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचल्यामुळे केईएमच्या अस्थिव्यंग विभागात जाणाऱ्या रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, केईएम रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग व ४ अ या कक्षांच्या वऱ्हांड्यातही सकाळच्या सुमारास पाणी साचले होते, ज्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
या घटनांमुळे पुन्हा एकदा मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधांची प्रश्नचिन्हासकट चर्चा सुरू झाली आहे.