Dombivli : इंदिरा नगर मधील सार्वजनिक शौचालयाला आग लावली का लागली?

माय मराठी
2 Min Read

शंकर जाधव (Dombivli)

डोंबिवली (Dombivli) पूर्वेतील इंदिरा नगर येथील सार्वजनिक शौचालयाला सोमवार, 2 जून रोजी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत शौचालय पूर्णतः जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यशस्वी ठरल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, ही आग लागली की लावण्यात आली याचा तपास होणे आवश्यक असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) कडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांना पक्षाच्या शिष्टमंडळाने चौकशीची मागणी करणारे निवेदन दिले.

अजय पौळकर (काँग्रेस पदाधिकारी) यांनी यासंदर्भात सांगितले की, “या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निधीतून सुमारे तीन वर्षांपूर्वी 25 लाख रुपये खर्च करून फायबर सीट आणि लोखंडी स्टील वापरून हे शौचालय उभारण्यात आले होते. अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण शौचालय जळून खाक झाले. माहिती मिळताच मी अग्निशमन दल, पोलीस व महावितरण यांना तत्काळ कळवले. तातडीने प्रतिसाद देत त्यांनी आग आटोक्यात आणली.”

ऍड. मिलिंद साळवे (आर.पी.आय. – आंबेडकर) यांनी सांगितले की, “ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणीतरी जाणीवपूर्वक लावली हे तपासणे महत्त्वाचे आहे. यासाठी आमच्याकडून पोलिसांना अधिकृत निवेदन देण्यात आले आहे.”

शिष्टमंडळात ऍड. मिलिंद साळवे, राजू काकडे (डोंबिवली शहर अध्यक्ष), अर्जुन केदार, रमेश कावरे, संतोष खंदारे, ज्ञानु अंभोरे, उत्तम वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी नागरिकांची आणि पक्षांची अपेक्षा आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने याच ठिकाणी तात्काळ नवीन सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more