Aditya Thackeray : गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या राजकारणाला आता वेग मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष (AAP) आणि काँग्रेसचा पराभव, तसेच दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचाली वेगाने घडू लागल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सक्रिय होत आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, त्यांनी १२ फेब्रुवारीला रात्री काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. तसेच, आज ते दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. याबाबत आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या भेटीमागील कारणे स्पष्ट केली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
➡ “काल रात्री राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आज अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करणार आहे. मतदान प्रक्रियेत मोठा घोटाळा (वोटर फ्रॉड आणि ईव्हीएम फ्रॉड) सुरू आहे. आपण लोकशाहीत राहतोय असं भासवलं जात आहे, पण ते सत्य नाही.
➡ शिवसेना, आप किंवा काँग्रेससोबत जे घडले, तेच उद्या बिहारमध्ये नितीश कुमार, आरजेडी, चंद्राबाबू नायडू यांच्यासोबतही होईल. भाजप प्रत्येक प्रादेशिक पक्ष फोडून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
➡ इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते भविष्यातील रणनीती ठरवतील आणि ही लढाई कोणत्याही एका नेत्याची नसून देशासाठी सुरू आहे.
➡ “तीन पक्षांनी (शिवसेना-शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी – अजित पवार गट) फोडाफोडीच्या राजकारणापलिकडे जावं. त्यांनी ज्यांना घ्यायचंय त्यांना घ्या, पण जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्या.”
➡ “गेल्या तीन महिन्यांत राज्य सरकारने काहीही ठोस काम केलेले नाही. आधी मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा झाली, मग मंत्रिमंडळ विस्तारात वेळ गेला, अजूनही पालकमंत्री-मालकमंत्र्यांवर वाद सुरूच आहे. सरकारची स्वार्थी आणि सत्ता लालसेने भरलेली मानसिकता स्पष्ट होते, पण जनतेच्या प्रश्नांवर कोणीही बोलायला तयार नाही!”