Ahilyanagar : महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम (२०२१) अंतर्गत खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य संचालनालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने २३० पैकी २१५ रुग्णालयांची तपासणी पूर्ण केली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२ रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांनी नियमांचे पालन केले आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी ही तपासणी केली जाते. रुग्णालयात घेतले जाणारे शुल्क व इतर सेवा शुल्काची माहिती दर्शनी भागात लावली आहे का, याची तपासणी झाली. तसेच, रुग्णहक्क संहिता स्पष्टपणे प्रदर्शित आहे का, हेही पाहण्यात आले.
तपासणीत आढळलेल्या त्रुटी:
४ रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र नाही.
३ रुग्णालयांनी परवाना नूतनीकरण केलेले नाही.
१० रुग्णालयांत दरसूची लावली नाही.
१० रुग्णालयांत मंजूर खाटा व प्रत्यक्ष खाटा यात तफावत आढळली.
५ रुग्णालयांकडे बायोमेडिकल कचऱ्याची योग्य व्यवस्था नाही.
महापालिकेने या ३२ रुग्णालयांना महिनाभरात त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा, त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. आरोग्य संचालनालयाने राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयांची तपासणी जिल्हा परिषदेमार्फत केली जात आहे, तर शहरातील तपासणी महापालिका आणि सरकारी रुग्णालय यंत्रणा करत आहे.