Akshay Shinde case : बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीबाबत त्याच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता हे प्रकरण पुढे लढायचे नाही आणि ते बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.
गुरुवारी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्यांच्या या मागणीची दखल घेतली. “तुमच्यावर कोणताही दबाव आहे का?” असा सवाल न्यायालयाने केला असता, “आमच्यावर कोणाचाही दबाव नाही”, असे शिंदे यांच्या पालकांनी स्पष्ट केले.
शिंदे यांच्या पालकांनी सांगितले की, “या प्रकरणामुळे आम्हाला मानसिक तणाव आणि खूप धावपळ सहन करावी लागत आहे. शिवाय, आमच्या सुनेला नुकतेच बाळ झाले असून ती एकटी राहते, त्यामुळे आम्ही तिच्यासोबत राहायला जाणार आहोत.” त्यांनी न्यायालयाकडे पुन्हा एकदा हे प्रकरण बंद करण्याची विनंती केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, अक्षय शिंदेच्या पालकांनी यापूर्वी त्याच्या चकमकीमागे मोठे आरोप केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील मूळ दोषींना वाचवण्यासाठीच अक्षयला मारण्यात आले, आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.