मायक्रोसॉफ्टने आपल्या सर्वात जुन्या आणि लोकप्रिय असलेल्या स्काईप (Skype) अॅपला बंद (App closed) करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या २२ वर्षांपासून हे अॅप व्हिडीओ कॉलिंग आणि चॅटसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. मात्र, आता मे २०२५ पर्यंत स्काईप सेवा बंद होण्याची शक्यता आहे. कंपनीने त्यांच्या नवीनतम विंडोज स्काईप प्रिव्ह्यूमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स जोडले आहेत, ज्यामध्ये काही युजर्सना ‘मे २०२५ पासून स्काईप उपलब्ध राहणार नाही’ असा इशारा दिसत आहे. त्यामुळे लवकरच मायक्रोसॉफ्ट स्काईप बंद करण्याची अधिकृत घोषणा करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्काईपच्या जागी मायक्रोसॉफ्ट आपल्या वापरकर्त्यांना Microsoft Teams वर स्थलांतरित करणार आहे. म्हणजेच, स्काईपवर कॉलिंग आणि चॅटिंग करणारे लोक आता टीम्सवर हे सर्व करू शकतील. याआधीही कंपनीने ३१ जुलै २०२१ रोजी Skype for Business बंद केले होते, त्यामुळे हे पाऊल अनपेक्षित नाही. मायक्रोसॉफ्ट Teams हा आता कंपनीचा प्राथमिक फोकस आहे, त्यामुळे स्काईपला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
स्काईपची सुरुवात २००३ मध्ये झाली आणि चार डेव्हलपर्सनी हे अॅप विकसित केले. त्यावेळी व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हे अॅप अत्यंत लोकप्रिय ठरले होते. आजही २ कोटी युजर्स स्काईप वापरतात, परंतु Microsoft Teams हे अधिक व्यापक आणि व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त असल्याने मायक्रोसॉफ्ट त्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.