Samay Raina : कॉमेडियन समय रैना सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटन्ट’ या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने अश्लील कमेंट केल्याने प्रकरण चांगलंच तापलं आहे. या घटनेवर जगभरातून टीका होत असून, यामुळे समयला मोठा फटका बसला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, विश्व हिंदू परिषदेनं समय रैनाच्या गुजरातमधील सर्व शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, या वादामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘समय रैना अनफिल्टर्ड’ हा त्याचा शो सूरत (17 एप्रिल) , वडोदरा (18 एप्रिल) आणि अहमदाबाद (19 व 20 एप्रिल) येथे होणार होता.
बुक माय शो वर या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू होती आणि काही शो हाऊसफुल्ल झाले होते. पण आता बुक माय शोने सर्व बुकींग रद्द केलं, त्यामुळे समयचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
समयने काल इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत सांगितलं की, “हे सगळं मला मानसिकरीत्या कठीण जात आहे. मी ‘इंडियाज गॉट लेटन्ट’चे सर्व व्हिडीओ डिलीट केले आहेत. माझं उद्दिष्ट लोकांना हसवणं आणि त्यांना आनंद देणं होतं. मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन. धन्यवाद!” ‘इंडियाज गॉट लेटन्ट’ वादामुळे समय रैनाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. शो रद्द झाल्यामुळे आर्थिक नुकसान तर झालंच, पण भविष्यात त्याला आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.