धकाधकीच्या जीवनात तणाव, चिंता आणि मानसिक थकवा ही सामान्य समस्या झाली आहे. अनेक लोक तणाव दूर करण्यासाठी विविध मार्ग अवलंबतात, त्यापैकी एक म्हणजे सिगारेट (Cigarette) ओढणे. पण खरंच सिगारेट तणाव कमी करते का? की ती केवळ एक मानसिक भ्रम आहे? तज्ज्ञ काय सांगतात, हे जाणून घेऊया.
सिगारेट आणि मेंदूवरील परिणाम
सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीन या रसायनामुळे मेंदूवर त्वरित परिणाम होतो. निकोटीन मेंदूमधील डोपामाइन आणि सेरोटोनिन यांसारख्या न्यूरोट्रांसमीटरच्या स्त्रवणास चालना देते, ज्यामुळे क्षणिक आनंद आणि रिलॅक्सेशनचा अनुभव येतो. त्यामुळे काही लोकांना सिगारेट तणाव कमी करत असल्याचे वाटते.पण ही भावना तात्पुरती असते. काही वेळाने मेंदूला निकोटीनची सवय लागते आणि त्याच्या कमतरतेमुळे आणखी तणाव जाणवतो. परिणामी, व्यक्ती वारंवार सिगारेट ओढते आणि निकोटीनच्या व्यसनात अडकते.
सिगारेट तणाव कमी करते की वाढवते? तज्ज्ञांचे मत
- सिगारेट ओढल्यावर तणाव क्षणभर कमी झाल्यासारखा वाटतो, कारण निकोटीनमुळे मेंदूमध्ये डोपामाइनचा स्तर वाढतो.
- नियमित सिगारेट सेवन केल्याने मेंदूतील नैसर्गिक डोपामाइन उत्पादन कमी होते, त्यामुळे व्यक्तीला तणाव अधिक जाणवतो.
- निकोटीनमुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो आणि शरीर सतत तणावाच्या स्थितीत राहते. त्यामुळे तणाव कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.
- सुरुवातीला “तणाव कमी करण्यासाठी” सिगारेट ओढणारी व्यक्ती हळूहळू या सवयीच्या आहारी जाते आणि ते एक व्यसन बनते.
सिगारेटशिवाय तणाव कमी करण्याचे पर्याय
सिगारेटशिवायही तणाव कमी करण्याचे अनेक आरोग्यदायी मार्ग आहेत. तज्ज्ञांच्या मते, खालील उपाय प्रभावी ठरू शकतात.
- शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि ध्यान करा.
- धावणे, चालणे, पोहणे किंवा जिमला जाणे यामुळे नैसर्गिकरित्या तणाव कमी होतो.
- शांत संगीत ऐकणे किंवा छंद जोपासणे तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त ठरते.
- तणाव टाळण्यासाठी आहारात व्हिटॅमिन B आणि ओमेगा-3 युक्त पदार्थ समाविष्ट करा.
- मित्र, कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींशी गप्पा मारणे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते.
सिगारेट सोडा, निरोगी पर्याय निवडा!
सिगारेट ओढल्याने क्षणिक तणाव कमी झाल्यासारखे वाटते, पण लांब पल्ल्यात हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तणाव कमी करण्यासाठी सिगारेटवर अवलंबून राहण्याऐवजी निरोगी आणि प्रभावी पर्याय निवडणे अधिक चांगले. मानसिक शांतता मिळवण्यासाठी योग, व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणी अवलंबा.