उल्हासनगरातील सुरक्षितता आणि शांततेला धोका ठरणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झाली आहे. मागील काही काळात शहरातील विविध भागांत अवैध नागरिक राहत असल्याच्या अनेक तक्रारींना (Crime) दुजोरा मिळाला आहे. या समस्येला गांभीर्याने घेत शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी माहिती पुरवणाऱ्यास 1,111 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करत या मोहिमेला एक वेगळे वळण दिले आहे.
मागील काही आठवड्यांपासून उल्हासनगरात बांगलादेशी नागरिकांच्या अवैध वावराची माहिती समोर येत होती. पोलिसांनी वेगवान कारवाई करत शहरातून १७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. परंतु यापेक्षा अधिक नागरिक शहरात अवैधपणे राहत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रकाराने प्रशासनाला सतर्क केले. एका बांगलादेशी नागरिकाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून हल्ला केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती. यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथक तयार केले.
शहरातील बांगलादेशी घुसखोरीचा धोका ओळखून शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती पोलिसांना पुरवणाऱ्यास 1,111 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीला नोकरीसाठी ठेवण्यापूर्वी किंवा घरभाड्याने देण्याआधी त्यांची चौकशी करावी, असे त्यांनी आवाहन केले आहे. भुल्लर महाराज यांच्या या घोषणेने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, स्थानिक लोकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. उल्हासनगर पोलिसांनी विशेष पथके तयार करत संशयित नागरिकांची चौकशी सुरू केली आहे. विविध भागांत छापेमारी करून बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले जात आहे. यामध्ये नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे.