Dhananjay Munde Case: धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात वांद्रे न्यायालयाने 4 जानेवारी रोजी निर्णय दिला आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचे अंशतः मान्य केले असून करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये, त्यांना स्वतःसाठी 1 लाख 25 हजार रुपये आणि त्यांच्या मुलीच्या विवाहापर्यंत 75 हजार रुपये देण्याचा समावेश आहे.
न्यायालयाचा निकाल ऐकल्यावर करुणा शर्मा भावूक झाल्या आणि त्यांनी कोर्टाचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “आज सत्याचा विजय झाला. अनेकांना वाटतं की, कोर्टात न्याय मिळत नाही, पण मला मिळालाय.”
मात्र, धनंजय मुंडेंच्या वकिलांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या वकील सायली सावंत यांनी सांगितले की, “हा निर्णय केवळ अंतरिम (तात्पुरत्या) पोटगीबाबत आहे. धनंजय मुंडे दोषी असल्याचा कुठलाही स्पष्ट निकाल न्यायालयाने दिलेला नाही. न्यायालयाने फक्त अर्जदाराच्या (करुणा शर्मा) आर्थिक गरजा पाहून हा आदेश दिला आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिप असल्याची कबुली दिली होती. त्याच आधारे न्यायालयाने हा आदेश दिला आहे. तसेच, “माध्यमांनी जबाबदारीने आणि अचूक वार्तांकन करावे, दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या बातम्या पसरवू नयेत,” अशी विनंतीही वकील सायली सावंत यांनी केली आहे.