अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मुलीच्या मृत्यूमागे सामूहिक बलात्कार आणि खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) मार्फत नव्याने सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सतीश सालियन यांनी याचिकेत दावा केला आहे की, दिशा हिने आत्महत्या केलेली नाही, तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला गॅलक्सी रेजिडेन्शी इमारतीवरून फेकून देण्यात आले. हे प्रकरण जबरदस्त राजकीय दबावाखाली दडपण्यात आले असून, खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावरही गंभीर आरोप करताना सांगितले की, किशोरी पेडणेकर यांच्या दबावामुळेच हे प्रकरण दडपले गेले आणि आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले.
त्यांनी मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केला असून, पोलिसांनी दिशाभूल केली, खोटे पुरावे मान्य करायला भाग पाडले आणि तपास योग्य दिशेने होऊ दिला नाही. यामुळेच या प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे.
याचिकेमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मोरिया यांच्यावरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या लोकांचा दिशाच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, भाजप आमदार नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी यापूर्वी केलेले आरोप सत्य असल्याचेही सतीश सालियन यांनी याचिकेत नमूद केले आहे.
दिशा सालियन हिचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मालाड येथील गॅलक्सी रेजिडेन्शी इमारतीतून पडून झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र, सतीश सालियन यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे की, त्या रात्री दिशाच्या घरी झालेल्या पार्टीदरम्यान तिच्यावर बलात्कार झाला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिला फेकून देण्यात आले. या याचिकेमध्ये सुमारे २५० पानी पुरावे आणि दस्तऐवज सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा उफाळून आले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
सतीश सालियन यांनी याचिकेत म्हटले आहे की, “दिशाची हत्या आणि सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.”मुंबई उच्च न्यायालय या याचिकेवर लवकरच सुनावणी घेणार आहे. या याचिकेमुळे दिशा सालियन प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागले असून, राज्याच्या राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.