डोंबिवली (Dombivli) (शंकर जाधव)
शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या स्वच्छता दूतांवर (क्लीन मार्शल) नागरिक त्रास देत जबरदस्तीने दंड वसूल केल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनबाहेर 20 मे रोजी झालेल्या घटनेनंतर या प्रकरणावरून खळबळ उडाली आहे.
ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उपशहरप्रमुख श्याम चौगुले, राहुल चौधरी, विभागप्रमुख प्रवीण विरकुड, प्रकाश कदम, शाखाप्रमुख राकेश मोहिते, सुनिल पवार आणि मंदार निकम यांनी नागरिकांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर स्टेशन परिसरात कार्यरत क्लीन मार्शलना थेट जाब विचारला. क्लीन मार्शलने काही नागरिकांना रस्त्यावर थुंकल्याच्या कारणावरून अडवून ठेवले होते. मात्र त्या नागरिकांनी आरोप फेटाळले असता, त्यांच्यात वाद उफाळून आला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, डोंबिवलीकरांनी अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या नावावर चुकीची दंडवसुली आणि धमकावणे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
“डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. परिसराचे सशोभीकरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने क्लीन मार्शलची नेमणूक महत्त्वाची आहे. मात्र 20 तारखेला जर नागरिकांना नाहक त्रास झाला असेल आणि ठाकरेंच्या शिवसेनेने तसे आरोप केले असतील, तर संबंधित मार्शलची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.”
– भरत ढोले, सुपरवायझर, क्लीन मार्शल