Dombivli: डोंबिवली (शंकर जाधव) गेल्या दोन दिवसात विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवलीत विविध भागांमध्ये धडक कारवाई केली. या कारवाईत तीन गांजा तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ३० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली आणि कल्याण शहरांना नशामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ चव्हाण व त्यांच्या पथक डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव, लक्ष्मण रेषा इमारत परिसरात गस्त घालत असताना रेल्वे मार्गाजवळ एका इसमाचा संशय आला. पोलिसांना आपला संशय आल्याचे लक्षात येताच त्याने पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांनी किरण शहा (४०, रा. तुकारामनगर, डोंबिवली पूर्व) जवळून आठ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत दीड लाख रुपये असून, किरण शहा याच्यावर मध्यप्रदेशमध्ये गांजा तस्करीचे गुन्हे दाखल झाला आहे.
दुसऱ्या कारवाईत, ठाकुर्लीतील चोळेगाव भागात गस्त घालत असताना, चोळेगाव तलावाजवळ दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता, सचिन मोरे (२१) आणि संजु लुहार (२४) या दोघांकडे २३ किलो गांजा आढळला, ज्याची किंमत ४.५७ लाख रुपये आहे. हे दोघेही मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवलीत अंमली पदार्थ विरोधी मोहिम तीव्र करण्यात आली आहे. पोलिसांना असे आढळले आहे की मध्यप्रदेशातून गांजा तस्करी करून डोंबिवलीत काही लोक या पदार्थांची मागणी करत आहेत. त्यामुळे या मागणी मागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, तसेच किरकोळ विक्रेते कोण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.