Soybean : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे सोयाबीन खरेदीसाठी किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी फोनवरून कृषिमंत्र्यांशी चर्चा केली असून, आता या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरवर्षी राज्यात शासनामार्फत सोयाबीन खरेदी केली जाते. मात्र, अनेकदा खरेदी प्रक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोयाबीन खरेदी सुरळीत पार पडण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील वर्षीपासून खरेदी प्रक्रिया नोव्हेंबरऐवजी ऑक्टोबरमध्येच सुरू करण्याचे नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच, शेतकऱ्यांची नोंदणीही लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.
सध्या काही बाजार समित्यांमध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात असली तरी सर्वत्र ही व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वाहतूक खर्च करावा लागत आहे. तो परवडत नसल्याने बरेच शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना 4000 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विकत आहेत.
किसान सभेने राज्यभरात हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत 6000 रुपये प्रति क्विंटल देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हा दर मिळत नसल्याने त्यांच्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.