अन्न पॅक (Food Packaging) करण्यासाठी आपण बहुतेक वेळा अॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपर यांचा वापर करतो. प्रवासात डब्ब्यात चपाती, पराठे गरम राहावे म्हणून अॅल्युमिनियम फॉइल वापरले जाते, तर बेकिंगसाठी बटर पेपर लोकप्रिय आहे.
मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की दोन्हींपैकी कोणता पर्याय तुमच्या आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आहे? आजच्या काळात अन्न सुरक्षा आणि आरोग्य याबाबत लोक अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या गोष्टी आरोग्यावर काय परिणाम करतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
अॅल्युमिनियम फॉइल – फायदे आणि तोटे
फायदे:
अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न अधिक काळ गरम राहते आणि लवकर खराब होत नाही. हे उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते, त्यामुळे बेकिंग, ग्रिलिंग आणि रोस्टिंगसाठी याचा अधिक वापर होतो. शिवाय, हे मोठ्या प्रमाणावर तापमान सहन करू शकते, त्यामुळे ओव्हन किंवा ग्रीलमध्ये सहज वापरले जाते.
तोटे:
गरम आणि आम्लयुक्त अन्न (टोमॅटो, लिंबू, चिंच इ.) अॅल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केल्यास त्यातील अॅल्युमिनियमचे कण अन्नात मिसळू शकतात. संशोधनानुसार, शरीरात अॅल्युमिनियमचे प्रमाण जास्त झाल्यास न्यूरोलॉजिकल विकार (अल्झायमर, डिमेन्शिया) आणि हाडांचे आजार होऊ शकतात. तसेच, मायक्रोवेव्हमध्ये अॅल्युमिनियम फॉइल वापरणे धोकादायक ठरू शकते, कारण त्यामुळे ठिणग्या निर्माण होण्याची शक्यता असते.
बटर पेपर – फायदे आणि तोटे
फायदे:
बटर पेपर हा रसायनमुक्त आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. तो अन्नात कोणतेही हानिकारक कण सोडत नाही, त्यामुळे तो बेकिंग, फूड रॅपिंग आणि स्नॅक्स स्टोरेजसाठी योग्य ठरतो. बटर पेपर अन्नाला चिकटत नाही, तसेच अतिरिक्त तेल आणि ओलावा शोषून घेण्यास मदत करतो, ज्यामुळे अन्न ताजे राहते.
तोटे:
अॅल्युमिनियम फॉइलच्या तुलनेत बटर पेपर उष्णता टिकवून ठेवण्यास कमी सक्षम असतो, त्यामुळे अन्न गरम राहण्यासाठी तो योग्य पर्याय नाही. तसेच, खूप जास्त तापमान सहन करू शकत नाही, विशेषतः जर तो वॅक्स-कोटेड असेल, तर तो वितळण्याची शक्यता असते.
You Might Also Like
कोणता पर्याय योग्य आहे?
जर तुम्हाला अन्न अधिक काळ गरम ठेवायचे असेल, तर अॅल्युमिनियम फॉइल हा पर्याय उत्तम आहे, मात्र गरम आणि आम्लयुक्त पदार्थांसाठी त्याचा वापर टाळावा. दुसरीकडे, आरोग्यासाठी अधिक सुरक्षित पर्याय हवा असेल, तर बटर पेपर उत्तम आहे, विशेषतः बेकिंग आणि फूड रॅपिंगसाठी. दररोजच्या जेवणासाठी बटर पेपर अधिक निरोगी पर्याय आहे, तर अॅल्युमिनियम फॉइल मर्यादित प्रमाणातच वापरणे योग्य ठरेल.