डोंबिवली (Dombivli) (प्रतिनिधी : शंकर जाधव)
डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात कल्याण जनता बँकेजवळ बुधवारी (१४ मे) दुपारी रस्त्याच्या खोदकामादरम्यान गॅस पाईपलाईन फुटल्याची गंभीर घटना घडली. पाईपलाईन फुटल्यानंतर परिसरात गॅसचा तीव्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ यासंदर्भात प्रशासन व आपत्कालीन सेवांना माहिती दिली. मात्र, घटनेनंतर अर्धा तास उलटूनही ना पोलिस दल, ना महानगर गॅसचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, अशी तक्रार नागरिकांनी व्यक्त केली. या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली होती.
काही वेळाने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व परिसर सुरक्षित करण्यात आला. यानंतर महानगर गॅसच्या पथकाने काही वेळात गॅस पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा आग लागण्याची घटना घडलेली नाही.
स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया:
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, “गॅसचा वास प्रचंड प्रमाणात पसरला होता. काही क्षणात काही अनर्थ घडला असता, तरी जबाबदारी कोणाची असती?”त्यांनी स्थानिक यंत्रणेकडून जलद प्रतिसाद यंत्रणेची अपेक्षा व्यक्त केली.
विकासकामांमध्ये समन्वयाचा अभाव?
या प्रकारावरून स्थानिक यंत्रणा, ठेकेदार व महानगर गॅस यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खोदकाम करण्यापूर्वी गॅस, वीज, पाणी यासारख्या सेवांची योग्य माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.