गुढीपाडवा (Gudhi Padhwa) हा सण मराठी नवंवर्ष म्हणून साजरा केला जातो. यंदा 30 मार्च 2025 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने घराघरांत गुढी उभारण्याची परंपरा जपली जाते, मात्र गुढी उभारताना काही गोष्टींचं विशेष पालन करणं आवश्यक आहे.
गुढी उभारताना घ्या ‘ही’ काळजी
भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा (Gudhi Padhwa) हा दिवस ‘महापर्व’ म्हणून ओळखला जातो. विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी उभारताना नवी कोरी, न वापरलेली आणि न धुतलेली साडी नेसवावी, असा शास्त्रानुसार सल्ला दिला जातो. कुणी दिलेली ओटीतील किंवा वापरलेली साडी गुढीला नेसवू नये. यामुळे गुढीचा सात्विकतेशी संबंध राहणार नाही, असे मानले जाते.
साडीच्या रंगाविषयीही काही नियम आहेत. गुढीला केशरी, लाल, पिवळा किंवा हिरव्या रंगाची साडी नेसवणं शुभ मानलं जातं. मात्र चुकूनही गुढीला पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी नेसवू नये. हे रंग शोक सूचक मानले जात असल्यामुळे गुढीच्या दिवशी त्यांचा वापर टाळावा.
गुढी उभारण्याचा योग्य काळ आणि गुढी उतरवल्यानंतरचं महत्व
गुढी (Gudhi Padhwa) उभारण्यासाठी कोणत्याही खास मुहूर्ताची आवश्यकता नसते. सकाळी सूर्य उगवल्यावर किंवा कोवळं ऊन असताना गुढी उभारावी. यावेळी सूर्यकिरणांमधून प्रजापती लहरी आणि सात्विक ऊर्जा जमिनीतून आणि हवेतून प्रसारित होत असते. गुढीवर ठेवलेला तांब्या या ऊर्जा शोषून घेतो. म्हणूनच गुढी नेहमी उगवत्या सूर्यासमोर सकाळीच उभारावी.
You Might Also Like
गुढी (Gudhi Padhwa) दिवसभर उभ्या अवस्थेत ठेवल्यानंतर सूर्यास्तानंतर ती उतरवावी. यानंतर गुढीवर ठेवलेला तांब्या – जो प्रजापती लहरींनी भरलेला असतो – त्यात आपल्या घरातील साठवणीतलं एखादं धान्य ठेवावं. हे धान्य तांब्यात रात्रीभर ठेवून, दुसऱ्या दिवशी अंघोळीनंतर साठवणीतील इतर धान्यांमध्ये मिसळावं. असं केल्यास घरात धनधान्याची भरभराट होते, अशी मान्यता आहे.