प्रोटीन्स हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, बहुतांश लोकांच्या आहारात प्रोटीन्सची कमतरता (Health Update) आढळते, विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये हा त्रास जास्त दिसतो. शरीराला पुरेशी प्रोटीन्स न मिळाल्यास वेगवेगळे त्रास होऊ शकतात, पण अनेकदा हे त्रास प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे होत आहेत, हे लक्षात येत नाही. त्यामुळे वेळीच योग्य आहार न घेतल्यास तब्येतीच्या तक्रारी वाढत जातात. तुमच्या शरीरातही प्रोटीन्स कमी आहेत का? जाणून घ्या ही महत्त्वाची लक्षणं!
- स्नायूंमध्ये वेदना आणि सतत थकवा – प्रोटीन्सची कमतरता असल्यास स्नायू कमकुवत होतात, वेदना जाणवतात आणि दिवसभर थकल्यासारखं वाटतं. UCLA Health च्या संशोधनानुसार, यामुळे शरीरात ऊर्जा कमी निर्माण होते.
- केस गळणे, नखं तुटणे आणि कोरडी त्वचा – प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होऊन गळतात, नखं पटकन तुटतात आणि त्वचा कोरडी व निर्जीव वाटते.
- शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर सूज येणे – ओटीपोट, पाय, तळपाय आणि हातांवर सूज येत असल्यास ते फक्त लठ्ठपणाचे लक्षण नसून प्रोटीन्सच्या कमतरतेमुळेही होऊ शकते.
- रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे – शरीराला पुरेशा प्रोटीन्सचा पुरवठा न झाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते आणि वारंवार सर्दी, ताप किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
- जखमा लवकर न भरून येणे – शरीरात प्रोटीन्स कमी असल्यास, त्वचेला आणि पेशींना पुनरुत्पादनासाठी आवश्यक पोषण मिळत नाही, त्यामुळे जखमा हळू भरतात.
- मूड स्विंग, चिडचिड आणि लक्ष केंद्रित न होणे – जर तुम्हाला वारंवार चिडचिड वाटत असेल, मूड बदलत असेल किंवा एकाग्रता कमी होत असेल, तर हेही प्रोटीन्सच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
- अधिक भूक लागणे आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा – शरीराला पुरेसं प्रोटीन न मिळाल्यास वारंवार भूक लागते, विशेषतः गोड किंवा कर्बोदकयुक्त (carbohydrates) पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते.
- फॅटी लिव्हरचा धोका – प्रोटीन्सची कमतरता असेल तर शरीरात चरबी साठण्याची शक्यता वाढते आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील, तर आहारात प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. डाळी, कडधान्यं, दूध, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, बदाम, अंडी आणि मांस यांसारखे पदार्थ आहारात घेतल्यास प्रोटीन्सची कमतरता दूर होऊ शकते. वेळेवर योग्य आहार आणि संतुलित पोषण घेतल्यास शरीर निरोगी राहील आणि आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतील!