India got latent: प्रसिद्ध पंजाबी गायक बी प्राक यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली आणि रणवीर अलाहाबादिया व त्यांच्या शोमध्ये होणाऱ्या कंटेंटची कठोर शब्दांत निंदा केली. त्यांनी सांगितले की ते मूळतः BeerBiceps च्या पॉडकास्टवर जाणार होते, पण त्यांनी तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यामागचं कारण म्हणजे त्या शोमध्ये असलेली विकृत मानसिकता आणि वापरण्यात आलेली अपमानास्पद भाषा असं स्पष्ट केलं.
“राधे राधे मित्रांनो! तुम्ही सगळे कसे आहात? मी एक पॉडकास्टसाठी जाणार होतो, पण मी तो कॅन्सल केला. का? कारण त्या ठिकाणी किती घाणेरडी विचारसरणी आहे आणि कशा प्रकारची भाषा वापरली जाते, हे तुम्ही स्वतःच पाहिलं असेल. समय रैनाच्या शोमध्ये जे काही घडत आहे, ते आपला भारतीय संस्कृती नाही. हे आपल्याला कधीही मान्य असू शकत नाही.”
बी प्राक यांनी पुढे शोमध्ये वापरण्यात आलेल्या अपमानास्पद आणि अश्लील विनोदांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की पालकांविषयी अश्लील गोष्टी सांगणं हे कोणत्याही प्रकारे विनोद नाही. “तुम्ही तुमच्या आई-वडिलांबद्दल कोणत्या गोष्टी सांगताय? कोणत्या प्रकारे चर्चा करताय? हाच विनोद आहे का? लोकांना शिव्या शिकवणं आणि सतत शिवीगाळ करणं ही कोणती विनोदबुद्धी आहे? मला समजत नाही, आजची पिढी कोणत्या दिशेने चालली आहे?”
बी प्राक यांनी शोमध्ये सहभागी झालेल्या एका सिख व्यक्तीबद्दलही म्हणजेच महिप सिंग यांच्या वर हि नाराजी व्यक्त केली. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की सिख धर्माच्या मूल्यांनुसार अशा भाषा आणि वर्तनाला समर्थन मिळू शकतं का? “शोमध्ये एक सरदारजी आले होते. सरदारजी, तुम्ही एक सिख आहात, तुम्हाला असं बोलणं शोभतं का? ‘मम्मी कशी आहे?’ असं विचारणं हे विनोद आहे का? तुम्ही लोकांना काय शिकवताय? आणि नंतर तुम्ही अभिमानाने सांगता की ‘मी शिव्या देतो, तर काय प्रॉब्लेम आहे?’ आम्हाला प्रॉब्लेम आहे, आणि तो कायम राहणार!”
बी प्राक यांनी रणवीर अलाहाबादिया यांच्यावरही निशाणा साधला. BeerBiceps हा पॉडकास्ट संतनांशी संवाद साधतो, सनातन धर्म आणि अध्यात्म यावर चर्चा करतो, पण त्याचवेळी तो विकृत कंटेंटला प्रोत्साहन देतो. “रणवीर अलाहाबादिया, तुम्ही सनातन धर्म आणि अध्यात्म याबद्दल बोलता. तुमच्या पॉडकास्टवर मोठमोठे संत येतात, पण तरीही तुमची विचारसरणी एवढी खालची आहे? जर आपण हे वेळीच थांबवलं नाही, तर भविष्यातील पिढीचं भविष्य खूप वाईट होईल.”
बी प्राक यांनी सर्व विनोदवीर आणि कंटेंट क्रिएटर्सना हात जोडून विनंती केली की त्यांनी अशा प्रकारच्या कंटेंटला थारा देऊ नये आणि नवीन पिढीला चांगलं शिकवावं. “मी सर्व विनोदवीरांना विनंती करतो, कृपया असा कंटेंट बनवू नका, जो पुढच्या पिढीला बिघडवेल. त्याऐवजी असा कंटेंट तयार करा, जो लोकांना प्रेरणा देईल. धन्यवाद. राधे राधे!”