India got latent : स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या यूट्यूब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महिलांच्या सन्मानाशी खेळ करणारे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून अॅड. अशिष रॉय आणि अॅड. पंकज मिश्रा यांनी महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर महिला आयोगाने पोलिसांना या शोवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या शोमध्ये समय रैना, रणवीर अलाहाबादी, अपूर्वा मखिजा आणि इतर सहकाऱ्यांनी महिलांचा अपमान करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. विशेषतः रणवीर अलाहाबादीने पालक आणि मुलांबाबत केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे वाद अधिक चिघळला. यामुळे सर्वच स्तरातून टीका होत असून, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
हा शो याआधीही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. एका भागात अरुणाचल प्रदेशच्या स्पर्धकाने “आम्ही कुत्रे खातो आणि आमच्या पाळीव प्राण्यांनाही खातो” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे अरुणाचल प्रदेशातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत शो विरोधात तक्रार दाखल केली होती. सध्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वर बंदी घालावी अशी मागणी जोर धरत आहे, आणि पोलिसांकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.