IPL 2025 साठी अधिकृत समालोचन पॅनलची घोषणा करण्यात आली आहे, पण यावेळी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचा नाव गायब आहे. गेल्या काही हंगामांमध्ये तो नेहमीच समालोचक पॅनलचा भाग असायचा, मात्र यावेळी त्याला संधी मिळाली नाही. एका अहवालानुसार, भारतीय क्रिकेटपटूंनी पठाणच्या टीकेबाबत तक्रारी केल्यामुळे त्याला बाजूला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
MyKhel च्या अहवालानुसार, एका खेळाडूने तर इरफान पठाणचा नंबर ब्लॉक केला कारण त्याने ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान त्या खेळाडूच्या कामगिरीवर कठोर टीका केली होती. एका सूत्राने सांगितले की, “त्याचे नाव (पॅनलमध्ये) असायला हवे होते, पण गेल्या दोन वर्षांपासून तो काही खेळाडूंवर वैयक्तिक अजेंडा राबवत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल अस्वस्थता होती.”
पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट, IMD ने काय सांगितले?
इरफान पठाण हा पहिलाच समालोचक नाही, ज्याला खेळाडूंच्या तक्रारीमुळे वगळण्यात आले आहे. याआधी संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांनाही खेळाडूंच्या नाराजीनंतर समालोचन पॅनलमधून काढण्यात आले होते.
2020 मध्ये संजय मांजरेकरला भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी BCCI समालोचन पॅनलमधून वगळण्यात आले. यामागचं कारण म्हणजे 2019 मध्ये झालेल्या वादग्रस्त प्रसंगांमध्ये त्याने हर्षा भोगलेसोबत वाद घातला, सौरव गांगुलीवर टीका केली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला “bits and pieces” खेळाडू म्हटले होते. यानंतर मांजरेकरने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “मी समालोचनाला संधी समजतो, हक्क नाही. BCCI माझ्या कामगिरीवर नाराज असेल, मी ते स्वीकारतो.”
IPL 2025 मध्ये बदललेले “हे” नियम तुम्ही वाचले का?
तसेच, IPL 2016 सुरू होण्याच्या काही दिवस आधी हर्षा भोगलेलाही कोणतेही कारण न देता समालोचन पॅनलमधून काढून टाकण्यात आले होते. त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते, “मी IPL मध्ये का नाही, हे अजूनही मला कळलेले नाही. मला लोकांनी नापसंत करणे समजू शकते, पण जर खेळाडूंनी माझ्या मतांबद्दल तक्रारी केल्या असतील, तर ते योग्य नाही.” इरफान पठाणच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे. आता त्याच्या जागी कोणत्या समालोचकांना संधी दिली जाते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.